करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीला सलग तीन महापूर आल्यामुळे शेतकरी व अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या शाळकरी मुलांच्या मदतीला आता करमाळा वकील संघ धावला आहे. पूरग्रस्त बाधित शाळकरी १०० मुलांना वकील संघाने शालेय साहित्य दिले आहे. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे हे साहित्य देण्यात आले आहे.
करमाळा तालुक्यातील खडकी, आळजापूर, तरटगाव, बाळेवाडी, पोटेगाव, निलज, बिटरगाव श्री, बोरगाव, पोथरे, आवाटी आदी गावात सीना नदीच्या पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे शेतीचे व पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे सुरु आहेत. ज्यांच्या घरात पाणी गेले होते त्यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या माध्यमातून तहसीलदार ठोकडे यांनी १० हजाराची आर्थिक मदत दिली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था नेते यांच्याकडूनही मदतीचा ओघ सुरु आहे.
करमाळा वकील संघाकडून पुरग्रस्त बाधित शाळकरी मुलांसाठी शालेय साहित्याचे १०० किट तहसिलदार ठोकडे यांच्याकडे देण्यात आले आहेत. यावेळी वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. ॲड. विनोद चौधरी, ॲड राहुल सावंत, ॲड. योगेश शिंपी, ॲड. अजित विघ्ने, ॲड. प्रशांत बागल, ॲड. नवनाथ राखुंडे आदी यावेळी उपस्थित होते. शालेय साहित्यामध्ये स्कुल बॅगसह, पॅड, पेन सेट, कंपास बॉक्स, रंग पेटी, चित्रकला वही, दोन क्वायर वही, दोन पेजेस सहा वह्या, वॉटर बॅग, पेन्सिल सेट आदी साहीत्य आहे.
महसुलाचे नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, निवासी नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी शत्रघून चव्हाण, आदर्श शिक्षक संतोष पोतदार, प्रभारी केंद्रप्रमुख निशांत खारगे, पुरवठा निरीक्षक दिव्यश्री ढोबळे, शब्बीर मुलाणी, सूरज कानगुडे, राहुल वाघमारे, बंकट साबळे आदीजण सर्वांना समान साहित्य वाटपासाठी परिश्रम घेत आहेत.