करमाळा (अशोक मुरूमकर) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या करमाळा तालुक्यातील सहा गटाच्या निवडणुकीसाठी आज (सोमवार) आरक्षण सोडत झाली. यामध्ये जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले व राणी वारे यांच्या कोर्टी व पांडे गटाचे आरक्षण सर्वसाधारण महिला पडले असल्याने त्यांचा पुन्हा निवडणुकीत उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर बागल गटाचे नेते दिग्विजय बागल, जगताप गटाचे शंभूराजे जगताप व पाटील गटाचे पृथ्वीराज पाटील हे कोणत्या गटातून निवडणुकीत उतरतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबरोबर कोर्टी गटात बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांचे नाव चर्चेत होते. मात्र तेथे महिला सर्वसाधारण आरक्षण पडले असल्याने त्यांच्या पत्नी वनिता गुळवे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय पांडे गटात अश्विनी बागल या निवडणूक रिंगणात उतरतील असे चित्र आहे. केम गटात अजित तळेकर यांच्या घरातील कोण उमेदवार असणार हे पहावे लागणार आहे.

करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे पांडे, वीट, केम, चिखलठाण, वांगी १ व कोर्टी असे सहा गट आहेत. या निवडणुकीत आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, बागल व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या भूमिका महत्वाच्या असणार आहेत. पक्षीय पातळीवर ‘महायुती’ आणि ‘महाविकास आघाडी’मध्ये ही निवडणूक झाली तरीसुद्धा स्थानिक पातळीवर येथील गटाचे नेतेहे पारंपरिक विरोधक आहेत. त्यामुळे कशी युती, आघाडी होणार यावर बरेच अवलंबून असणार आहे. या निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या जास्त असली तरी प्रत्येक गटाकडे इच्छुकही जास्त दिसत आहेत.
पांडे गटात सर्वसाधारण महिला आरक्षण पडले असून येथे संतोष वारे हे पत्नी राणी वारे यांना निवडणूक रिंगणात उतरवतील. मात्र ते स्थानिक कोणत्या राजकीय गटाकडून उमेदवारी घेतील हे पहावे लागणार आहे. शिंदे गटाकडून येथे सुजित बागल हे दावेदार होते. मात्र महिला आरक्षण पडल्याने त्यांच्या पत्नी अश्विनी बागल यांच्यासाठी ते उमेदवारी मागतील. बागल गटाचा हा बालेकिल्ला असून दिग्विजय बागल हे घरातील कोणाची उमेदवारी देतील की काय करतील हे पहावे लागणार आहे. या गटात स्व. प्रदीपकुमार जाधव पाटील यांचे पुतणे अजिंक्य जाधव पाटील यांच्या घरातीलही उमेदवारीचा विचार शिंदे गट करू शकतो. पाटील गटाकडून मोहिते पाटील समर्थक डॉ. अमोल घाडगे यांच्याही घरातील उमेदवारीचा विचार होऊ शकतो. देवानंद बागल यांचाही निर्णय येथे महत्वाचा ठरणार असून सावंत गट देखील येथे इच्छुक आहे.
वीट गटात भाजपचे गणेश चिवटे यांनी तयारी केली होती. मात्र येथे सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने त्यांच्या घरात महायुतीची उमेदवारी जाऊ शकते. पाटील गटाकडून येथे बिभीषण आवटे, गहिनीनाथ ननवरे यांच्या घरातील उमेदवारीचा विचार होऊ शकतो. बागल गटाकडून सतीश नीळ देखील जागेसाठी दावा करू शकतात. मात्र शेवटी येथे कशी निवडणूक होईल हे पहावे लागणार आहे.
केम गटात ओबीसी महिला आरक्षण पडले आहे. येथे पाटील गटाकडून अजित तळेकर यांच्या घरातील उमेदवारी दिली जाऊ शकते. या गटात महावीर तळेकर यांच्या घरातीलही उमेदवारीचा विचार बागल गट करू शकतो. शिंदे गटाकडून अण्णा पवार हे दावेदार आहेत. विलास राऊत यांच्याही घरातील उमेदवारीची चर्चा सुरु झाली आहे. जगताप गटाकडूनही येथे उमेदवारीसाठी सागर दौड हे दावा करू शकतात. याशिवाय प्रहारचे संदीप तळेकर काय भूमिका घेतील पहावे लागणार आहे.
वांगी गट हा पाटील गटाचा बालेकिल्ला आहे. याच गटातून आमदार नारायण पाटील हे जिल्हा परिषदेची निवडणूक लढले होते. येथे शेलगाव येथील अमर ठोबरे, माजी सभापती अतुल पाटील, रामेश्वर तळेकर यांच्या घरातील कोणाला उमेदवारी दिली जाणार का हे पहावे लागणार आहे. शिंदे गटाकडून उदयसिंह देशमुख हे उमेदवारीसाठी दावेदार ठरू शकतात. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नीलकंठ देशमुख यांची भूमिका येथे महत्वाची ठरणार आहे. येथे महिला सर्वसाधारण आरक्षण आहे.
चिखलठाण गटात सर्वसाधारण आरक्षण पडले असल्याने सर्वांचे लक्ष या गटाकडे लागले आहे. चंद्रकांत सरडे हे येथे शिंदे यांच्या गटाकडून उमेदवारीसाठी दावेदार आहेत. पाटील गटाकडून विकास गलांडे, माजी सभापती दत्तात्रय सरडे यांचेही नाव चर्चेत आहे. दादा चौघुले, अक्षय सरडे, धंनजय डोंगरे, सागर पोरे यांची नावे समोर येत आहेत. भाजपचे प्रा. रामदास झोळ हे देखील येथे दावा करू शकतात.
कोर्टी गटात सुभाष गुळवे यांच्या पत्नी वनिता गुळवे, माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय आशिष गायकवाड, ऍड. नितिनराजे भोसले, काशिनाथ काकडे, बाळासाहेब पांढरे यांच्याही घरातील कोणाला उमेदवारी मिळणार का? हे पहावे लागणार आहे. प्रत्येक गटात राजकीय गटाकडूनही निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची सांख्य जास्त असल्याचे दिसत आहे. मात्र येणाऱ्या काळात कोणता राजकीय गट कसा निवडणुकीत उतरेल यावर समीकरण ठरणार आहेत.