करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्यासह माझ्याकडे असलेल्या सर्व तालुक्यात यापुढील निवडणुका ‘कमळ’ चिन्हांवरच व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहे, असे सूचक वक्तव्य भाजपचे सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष चेतन उर्फ बाळासाहेब केदार सावंत यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले आहे.
सावंत हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक आहेत. ते सांगोला नगरपालिका माजी उपनगराध्यक्ष व भाजपचे सांगोला तालुका अध्यक्ष होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये माढा लोकसभा मतदार संघामध्ये जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, करमाळा व माढा अशा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. भाजपने सोलापूर ग्रामीणसाठी दोन जिल्हाध्यक्ष व शहरासाठी एक शहराध्यक्ष अशी नेमणूक केलेली आहे. सोलापूर जिल्हाध्यक्ष व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे सोलापूर मतदारसंघातील तालुक्यांची जबाबदारी व सावंत यांच्याकडे माढा लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांची जबाबदारी आहे.
सावंत यांच्याकडे जबाबदारी असलेला करमाळा, माढा व सांगोला तालुका हा विधानसभेसाठी शिवसेनेकडे आहे. मात्र सावंत यांनी केलेल्या विधानामुळे शिवसेनेत (शिंदे गटात) अस्वस्थता वाढली आहे. शिवसेनेचे जे मतदारसंघ आहेत त्यावर आम्ही ठाम असल्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे यांनी यापुढेच स्पष्ट केले आहे. मंत्री तानजी सावंत यांच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र अशा स्थितीत सावंत यांनी केलेले विधान महत्वाचे मानले जात असून शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
करमाळा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सावंत यांनी विधानसभा निवडणूक असा उल्लेख केलेला नसला तरी ‘माझ्याकडे असलेले सर्व तालुक्यात यापुढे सर्व निवडणूका ‘कमळ’ चिन्हावर व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू’ असल्याचे सांगितले आहे. पत्रकारांच्या एका प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले. विधानसभा असा त्यांनी उल्लेख केलेला नसला तरी सर्व निवडणुका म्हटल्यानंतर त्यात विधानसभा मतदार संघही येतच आहे. जर असे झालेच तर शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील व करमाळ्याचे चिवटे यांची डोकेदुखी वाढणार आहे. करमाळ्यात माजी आमदार पाटील हेही उमेदवारीसाठी दावेदार आहेत. मात्र येणाऱ्या काळात काय चित्र असेल हे पहावे लागणार आहे.
करमाळ्यातील पत्रकार परिषदेला भाजपचे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभुराजे जगताप, जिल्हा नियोजन समितीचे गणेश चिवटे, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, दीपक चव्हाण, सुहास घोलप, शशिकांत पवार, आदी उपस्थित होते.