करमाळा (अशोक मुरूमकर) : येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या निमगाव येथील फार्महाऊसवर मंगळवारी (ता. २१) सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रवादीची (अजित पवार गट) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिली आहे. या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात माजी आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिंदे यांनी महायुती म्हणूनच या निवडणुका लढवल्या जाणार असल्याचे करमाळ्यात माध्यमांशी बोलताना काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यात आता ही बैठक होत असल्याने याला महत्व आले आहे.
या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी, संघटनात्मक बांधणी व तालुकानिहाय, गटनिहाय रणनीती, प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवादव जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाणार आहेत. तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.