करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात पक्षापेक्षा गटातटाचे नेहमीच राजकारण चालत आले आहे. पक्ष कोणताही असो आमदार नारायण पाटील यांचा पाटील गट, माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा शिंदे गट, बागल गट व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा जगताप गट यांच्या भूमिका कायम महत्वाच्या राहिल्या आहेत. ‘महायुती’च्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरणार असली तरी बागल व शिंदे एकत्र आले नाही तर पाटील गटाला रोखणे कठीण जाईल असे बोलले जात आहे. ‘महाविकास आघाडी’चा मात्र येथे फारसा सध्या तरी प्रभाव दिसत नाही. काँग्रेस व ठाकरेंची शिवसेना काय रणनीती आखणार हे पाहावे लागणार आहे.
थोडक्यात पार्श्वभूमी…
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुक कशी असणार यांची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तालुक्याच्या राजकारणातील सर्व प्रमुख गट रणनीती आखात आहेत. पक्षाचे प्रमुख देखील सक्रिय झाले आहेत. आमदार पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ‘तुतारी’वर विधानसभेत विजयी झाले होते. त्यांना सध्या शिवसेनेत (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे) असलेले माजी आमदार जगताप यांनी पाठींबा दिला होता. सावंत गट देखील त्यांच्याबरोबर होता. माजी आमदार शिंदे हे या निवडणुकीत अपक्ष उतरले होते. उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादीशी त्यांची जवळीक आहे. त्यांना भाजपचे गणेश चिवटे यांनी पाठींबा दिला होता. बागल गटाचे नेते ‘मकाई’चे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल हे शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार होते. महेश चिवटे व मंगेश चिवटे यांच्याही यामध्ये महत्वाच्या भूमिका राहिल्या होत्या. गणेश चिवटे यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल कारवाई झाली होती.
सध्या काय स्थिती आहे
गेल्यावर्षी विधानसभा निवडणूक झाली होती. त्यानंतर काही दिवसातच जगताप हे शिवसेनेत गेले. यातही चिवटे यांची भूमिका महत्वाची होती. बागल व चिवटे यांच्यात सध्या संघर्ष आहे. बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल या भाजपात आहेत. तर दिग्विजय बागल हे शिवसेनेत आहेत. मात्र चिवटे आणि बागल यांच्यात सतत संघर्ष असल्याचे दिसत आहे. गणेश चिवटे हे देखील काही दिवसातच भाजपवासी झाले. आणि सध्या ते सक्रिय आहेत देखील. माजी आमदार शिंदे यांच्याशी त्यांची जवळीक आहे. बागल यांचे विरोधक असलेले जगताप हे शिवसेनेत आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत पाटील यांना मदत केली होती आणि मोहिते पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्याशीही त्यांची जवळीक कायम असल्याचे दिसत आहे.
कशी होणार महायुती…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत करमाळा तालुक्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार) यांची ‘महायुती’ कशी होईल हे पहावे लागणार आहे. कारण येथे जगताप गट शिवसेनेत आहे. तर शिंदे गट राष्ट्रवादीत आहे. बागल गट शिवसेना व भाजपात आहे. हे तिन्ही गट प्रमुख आहेत. आणि ते एकमेकांचे पारंपरिक विरोधक आहेत. त्यामुळे ते एकत्र कसे येतील? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
पाटील गटाला कसे रोखायचे…
करमाळा तालुक्यात पाटील गटाची ताकद मोठी आहे. विधानसभा निवडणुकीत जगताप व सावंत यांनी पाठींबा दिल्याने तर ताकद आणखी वाढली आहे. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवणुकीत बागल गटानेही अप्रत्यक्षपणे पाटील गटालाच फायदा होईल अशी भूमिका घेत पाटील गटाला मदत केली त्यामुळे त्या ताकदीमध्ये भर पडली आहे. शिंदेंना संपवणे (खासगीत राजकीय दृष्ट्या जसे बोलले जाते तसाच तो शब्द वापरला आहे) हा एकच अजेंडा शिंदे विरोधी गटाचा आहे. त्यातही पाटील यांचाच फायदा होत आहे. त्यामुळे पाटील गटाचीच ताकद वाढत आहे. यात शिंदे यांच्यासमोर पाटील गटाला कसे रोखायचे याचे आव्हान आहे.
अशी आहे चर्चा…
शिंदे आणि बागल गट एकत्र येऊ शकतात. पण या एकत्र येण्यावर बागल गटातील काही प्रथम पाळीतील कार्यकर्त्यांची सहमती नाही. शिंदेंशी जोडलेला कार्यकर्ता पुन्हा बागल गटात येईल का? याची भिती काहींच्या मनात आहे. पाटील गटाबरोबर युती केली तर जगताप गटाचे काय? अशीही चर्चा बागल गटाबाबत केली जात आहे.
कोणाचे कसे प्रयत्न आहेत…
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे स्वतः शिंदे आणि बागल यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना कसे यश येणार हे पहावे लागणार आहे. तर मोहिते पाटील हे बागल यांनी शिंदे यांच्याबरोबर जाऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत, असे समजत आहे. नगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची समीकरणे यावरच ठरणार आहेत. नेमके काय होणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष आहे.
महाविकास आघाडीचे काय…
तालुक्यातील जगताप, बागल व शिंदे हे एकमेकांचे विरोधक असले तरी महायुतीत आहे. आमदार पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत. काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना काय करेल यावर महाविकास आघाडीचे चित्र दिसेल. मात्र अजूनही तरी त्यांच्यात फारसी चर्चा दिसत नाही. माध्यमांपर्यंतही त्यांच्यातील घडामोड आलेली दिसत नाही. युवासेनेचे शंभूराजे फरतडे सोडले तर कोण माध्यमातही सध्या दिसत नाही.
गुळवे व वारेंच काय…
बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे आमदार रोहित पवार यांचे विश्वासू आहेत. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांनी आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत पाटील यांची साथ सोडत शिंदे यांना मदत केली होती. या निवडणुकीत त्यांनी टोकाची टीकाही केली होती. सध्या ते काय करतील हे पहावे लागणार आहे. त्यांच्या पत्नी कोर्टी गटातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे संतोष वारे यांचे तालुकाध्यक्षपद गेले आहे. सध्या मोहिते पाटील समर्थक अमरजित साळुंखे यांच्याकडे हे पद गेले आहे. वारे यांच्या पत्नी पांडे गटातून इच्छुक आहेत. ऍड. राहुल सावंत हे देखील या गटात इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुम्हाला काय वाटते…
करमाळा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत कोणता गट काय भूमिका घेईल याबाबत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कळवा.
