करमाळा (सोलापूर) : चिखलठाण येथे महिला शेतकऱ्यांची शेती शाळा झाली. करमाळा तालुका कृषी अधिकारी व जेऊर मंडळ कृषी अधिकारी यांच्या वतीने ही कृषी शाळा घेण्यात आली. राज्यात कृषी विभागाच्या वतीने विविध योजनांमधून क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत पीकनिहाय शेती शाळा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
चिखलठाण येथे ऊस पिकाची शेती शाळा झाली. कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक मधुकर मारकड, दत्तात्रय गायकवाड, कृषि सहाय्यक रोहिणी सरडे, सुप्रिया शेलार यांच्या उपस्थतीमध्ये ही शाळा घेण्यात आली. शेती शाळा म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतात पिकांचा आणि शेती पद्धतीचा अभ्यास करण्यास शिकविणे. शेती संदर्भात उद्भवणाऱ्या विविध समस्या व त्यावरील उपाय स्थानिक पातळीवरील शोधण्याचा प्रयत्न करणे. तसेच इतर प्रमुख पिकांवर उद्भवणारे कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच त्यांच्या नियंत्रणाच्या उपाययोजना याबद्दलची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे.