करमाळा नगरपालिका निवडणुकीत देवी व सावंत गटाचीच भूमिका महत्वाची ठरेल!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. २ डिसेंबरला नगराध्यक्षासह २० नगरसेवकांसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. इच्छुकांना निवडणुकीसाठी येत्या सोमवारपासून (ता. १०) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. जगताप व बागल हे पारंपरिक विरोधी गट असले तरी या निवडणुकीत देवी व सावंत गटाची भूमिका महत्वाची ठरेल असे चित्र राजकीय पटलावर दिसत आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या ३० वर्षाच्या इतिहासात शहरवासीयांचा कल जगताप गटाकडे असल्याचे दिसत आहे. थेट नागिकांमधून नगराध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीत २००१ मध्ये जगताप गटाच्या सुनिता वाशिंबेकर व २०१६ मध्ये वैभवराजे जगताप विजयी झाले होते. जगताप गट कधी स्वतंत्रपणे तर कधी स्थानिक पातळीवर सावंत गट व नागरिक संघटना अथवा बागल गटाबरोबर आघाडी करून राजकारणात केंद्रस्थानी राहिला आहे. या निवडणुकीत जगताप गटाला रोखण्यासाठी कशी युती आघाडी होणार? हे पहावे लागणार आहे. त्यात सावंत गट व देवी गट काय निर्णय घेतील त्यावर समीकरणे अवलंबून राहतील, असे बोलले जात आहे.

सध्या सावंत गट आमदार नारायण पाटील यांच्याबरोबर आहे. तर जगताप गटानेही विधानसभा निवडणुकीत पाटील यांनाच पाठींबा दिला होता. आता सावंत गटानेही नगराध्यक्ष पदावर दावा केला आहे. शहरात गट वाढवायचा असेल तर हीच संधी म्हणत ‘आले तर बरोबर अन्यथा स्वतंत्र’ अशी त्यांची तयारी असल्याचे सांगितले जात आहे. नगराध्यक्षासह २१ उमेदवार त्यांचे निवडणुकीसाठी तयार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ते काय निर्णय घेतील हे पहावे लागणार असून त्यावर बरीच समीकरणे ठरणार आहेत. जगताप यांनीही नगराध्यक्षपदासाठी उमेदवार तयार केला आहे. त्यांचीही निवडणुकीची तयारी झालेली आहे.

देवी गटाचे कन्हैयालाल देवी हे विधानसभा निवणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याबरोबर होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. बागल गटाची करमाळ्यात बऱ्यापैकी ताकद आहे. मात्र महायुती म्हणून देवी व बागल हे एकत्र येतील का? हे पहावे लागणार आहे. नगराध्यक्ष पद कोणाला देंईचे हा त्यांच्यात कळीचा मुद्दा ठरू शकणार आहे. बागल गटाकडे नगराध्यक्षपदासाठी तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यांची युती कशी होणार हे पहावे लागणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमधील प्रमुखांची बैठकही घेतली होती. तेव्हा बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, सूर्यकांत पाटील, प्रा. रामदास झोळ, तालुकाध्यक्ष रामा ढाणे, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते. मात्र भाजपमधील सर्व नेत्यांना एकत्र करणे आव्हान असणार आहे.

महायुती म्हणून या निवडणुकीत एकत्र लढायचे ठरले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये मनोमिलन होणार का? हा प्रश्न आहे. कारण गेल्यावेळी बागल व जगताप गट एकत्र निवडणुकीत उतरला होता. मात्र पुढे काही दिवसातच त्यांच्यात संघर्ष सुरु झाला. आता जगताप हे शिवसेनेत (शिंदे गट) आहेत. जिल्हा प्रमुख महेश चिवटे, जगताप व बागल यांच्यातही संघर्ष आहेच. त्यामुळे महायुती म्हणून निवडणुकीत ते कसे एकत्र येणार हे पहावे लागणार आहे. आणि गट म्हणून देवी गट व बागल गट हे एकत्र येथील का? हे पहावे लागणार आहे. येथे देवी यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. देवी व माजी आमदार शिंदे यांची जवळीक आहे. नगरपालिका निवडणुकीत त्यांच्यात कसे समीकरण जुळणार हे पहावे लागणार आहे.

मोहिते पाटील यांनी या निवडणुकीत लक्ष घातले तर बागल, जगताप व सावंत यांना ते कसे एकत्र आणतील हे पहावे लागणार आहे. बाजार समिती निवडणूक जगताप यांना बिनविरोध देण्यासाठी मोहिते पाटील यांची भूमिका महत्वाची ठरली होती. तेव्हा जगताप व माजी आमदार शिंदे एकत्र होते. तरीही मोहिते पाटील यांची मध्यस्थी महत्वाची ठरली होती. त्यामुळे आता या निवडणुकीत त्यांची भूमिका काय असेल हे पहावे लागणार आहे. करमाळा शहराच्या राजकारणात माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा जगताप गट, बागल गट, देवी, सावंत यांच्यासह घोलप, ढाणे, फंड, चांदगुडे हे काय करतील याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. घोलप यांचा देखील नगराध्यक्षपदासाठी दावा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *