(अशोक मुरूमकर) : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहराजवळ पांडे येथे आज (बुधवारी) सकाळी दुःखद घटना घडली. दोन दिवसांपूर्वी विवाह झाल्यानंतर साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या कारमधील चौघांवर काळाने घाला घातला. या भीषण अपघातात नवदांपत्यासह सहाजण बचावले आहेत. त्यात एका आठ महिन्याच्या चिमुकलीचाही समावेश आहे. या अपघातानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सांयकाळी साडेचार वाजताच्या सुमारास चारही मृतदेह रुग्णवाहिकेनी त्यांच्या मूळगावी नेले. एका गाडीत पती- पतीनीचा व दुसऱ्या गाडीत बहिणी- बहिणीचा मृतदेह नेण्यात आला. या दृश्याने उपस्थितांचे मन हेलावून टाकले. नातेवाईकांची भाषा समजत नव्हती मात्र त्यांचे हावभाव आणि देहबोली सर्व दुःख सांगून जात होती.
शुभविवाहाचा आंनद साजरा करत असतानाच साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गुलबर्ग्यातील कुंभार कुटुंबीय तवेराने (केए ३२ एन ०६३१) शिर्डीला निघाले होते. मात्र दर्शन घेण्यापूर्वीच त्यांची कार व कंटेनरचा अपघात झाला. कारमध्ये आठ महिन्याच्या चिमुरड्यासह १० जण होते. त्यातील चौघेजण जागीच ठार झाले. दोन दिवसांपूर्वी श्रीधर श्रीशैल कुंभार व सौम्या यांचा विवाह झाला. श्रीधर हा अभियंता असल्याचे सांगितले जात आहे. विवाह झाल्यानंतर ते सहकुटुंब दर्शनाला निघाले होते. ठार झालेल्यामध्ये श्रीधरचे आई- वडील व सौम्याचे नातेवाईक यांचा समावेश आहे. सौम्याकडील नातेवाईक या दोघीही बहिणी- बहिणी होत्या असे सांगितले जात आहे.

काही दिवसापूर्वीच झालेल्या या रस्त्यावर गतिरोधक सोडला तर एकही खड्डा नाही. सोलापूरकडून आलेल्या कुंभार कुटुंबीयांची कार पहाटे पावणेसहाच्या दरम्यान पांडेजवळ वळणावर आली. तोच काळाने त्यांच्यावर घाला घातला. समोरून आलेल्या कंटेनरला (आरजे ०६ जिजे२४८६) त्यांची कार धडकली. आणि रस्त्याच्या खाली जाऊन कोसळली. यामध्ये गाडीचा चक्काचूर झाला. या कारमधील श्रीशैल चांदेगा कुंभार (वय ५५), शशिकला श्रीशैल कुंभार (वय ५०), ज्येमी दीपक हुनशालमठ (३८ रा. गुलबर्गा) व शारदा हिरेमठ (वय ६७, रा. हुबळी) हे ठार झाले. यातील श्रीशैल व शशिकला हे पती- पत्नी नवरदेव श्रीधरचे आई- वडील होते. ज्येमी दीपक हुनशालमठ व शारदा हिरेमठ हे नवरी सौम्याचे नातेवाईक होते. त्या दोघी बहिणी होत्या. या अपघातात सौम्या श्रीधर कुंभार (वय २६), कावेरी विश्वनाथ कुंभार (वय २४), शशिकुमार श्रीशैल कुंभार (३६), श्रीधर श्रीशैल कुंभार (वय ३८), नक्षत्रा विश्वनाथ कुंभार (वय ८ महिने) व श्रीकांत रामकुमार चव्हाण (वय २६) अशी जखमीची नावे आहेत.

या अपघाताची माहिती समजताच पांडे येथील नागरिक मदतीला धावले. करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. ठार झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक आल्यानंतर रुग्णालय परिसरात त्यांनी हंबरडा फोडत भावनांना वाट करून दिली. करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस व रुग्णालयातील डॉक्टर नातेवाईकांना मदत करत होते. पवार रुग्णालयात डॉ. पवार यांनी जखमींवर उपचार केले. त्यातील चिमुरड्याला तेथील सिस्टर यांनी सांभाळले.

दुःखाचा डोंगर कोसळला असताना नवरदेव सर्वांना धीर देत होता. हातावरची मेंहंदीवर रक्त सांडलेले होते. एका हातावर बांधलेले दोऱ्यातील हळकुंड सर्वांना भावनावश करत होते. तेथेच हातापायावर असलेली मेंदी आणि उपचार घेत असलेले नवरीला पाहून अनेकांचे डोळे पाणावले. दोघांमध्ये कावेरीवर उपचार सुरु होते. त्यांची चिमुरडी कधी आईच्या अंगावर खेळत होती. तर कधी सिस्टरकडे खेळत होती. आपल्यावर काय दुःख आले आहे याची तिला कसलीही जण नव्हती. दिवसभर सर्व प्रक्रिया झाल्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेने त्यांच्या मूळगावी नेले. करमाळ्यापासून २२५ किलोमीटरवर कुंभार यांचे मुळगाव आहे. तेथे त्यांचे मृतदेह नेण्यात आले, असे केशव प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचे चालक बबलू यांनी सांगितले. दुसऱ्या रुग्णवाहिकेत दोन मृतदेह होते.