शिवसेना स्वतंत्र! करमाळ्यात नगराध्यक्षपदी जगतापांची उमेदवारी कायम, तांबोळी पती- पत्नी रिंगणात

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदनीदेवी जगताप या पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. नगरपालिकेच्या एका नगराध्यक्ष व २० नगरसेवक पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीत शिवसेना जगताप गटाच्या माध्यमातून स्वतंत्र निवडणूक रिंगणात उतरली आहे. यामध्ये जिल्हा प्रमुख महेश चिवटे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांची भूमिका महत्वाची असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर माजी आमदार जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर नगरपालिका निवडणुकीत शिवसेना स्वतंत्रपणे उतरली आहे. १० प्रभागातून जरीमुन्नीसा सय्यद, आशितोष शेलार, राजू वाघमारे, पल्लवी अंधारे, अल्ताफ तांबोळी, संगीता खाटेर, माधवी पोळ, चंद्रकांत राखुंडे, साजिदा कुरेशी, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, सुवर्णा आल्हाट, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, अश्विनी अब्दुले, युवराज चिवटे, मीनल पाटोळे, ज्योतीराम ढाणे, अश्विनी घोलप, रोहित बालदोटा, निलेश कांबळे व शबाना तांबोळी हे २० उमेदवार रिंगणात आहेत.

शिवसेनेकडून माजी आमदार जगताप यांची करमाळा व कुर्डवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे विधानसभा निवणुकीत शिवसेनेचे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी पदाचा राजीनामा देत संताप व्यक्त केला होता. त्याचा किती परिणाम होणार हे पहावे लागणार आहे. मात्र सध्यस्थितीत शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार देऊन निवडणुकीत उतरली आहे.

करमाळा तालुक्यात कायम गटाचे राजकारण चालत आले आहे. गेल्या निवडणुकीत जगताप व बागल एकत्र होते. मात्र त्यांची ही युती काही महिन्यातच तुटली होती. जगताप व बागल हे पारंपरिक विरोधक आहेत. बागल गटाच्या नेत्या सध्या भाजपात आहेत. दिग्विजय बागल हे काय करतील हे पहावे लागणार आहे. मात्र राज्यात महायुती असतानाही करमाळ्यात शिवसेना व भाजप वेगळे लढत असल्याचे चित्र आहे. सुरुवातीला जगताप गट संगीता खाटेर यांना उमेदवारी देतील असे वाटत होते. मात्र जगताप यांची उमेदवारी निश्चित केली आणि ती कायमही राहिली आहे. निकालात काय होणार हे पहावे लागणार आहे.

माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या प्रभागात उमेदवारी डावलल्याने परदेशी परिवाराने बंडखोरी केली आहे. त्यांनी सावंत गटात प्रवेश केला आहे. मात्र त्याचा किती परिणाम होणार हे पहावे लागणार आहे. उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीचा धोका होऊ नये म्हणून शेवटच्याक्षणी उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. या निवडणुकीत तांबोळी पती पत्नी निवडणुकीत उतरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *