करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीत भाजपने स्वतंत्र लढण्याची तयारी केली असून सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. अर्ज मागे घेण्याच्यादिवशी वेगळे काय चित्र दिसेल का हे पहावे लागणार आहे. नगराध्यक्षपदासाठी कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी यांचा अर्ज दाखल झालेला असून पक्षाने एबी फॉर्म देऊन त्यांच्या नावावर शिकामोर्तब केले आहे. शेवटच्याक्षणापर्यंत उमेदवारी मिळेल या आशेवर विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या पत्नी जयश्री घुमरे होत्या. मात्र त्यांना डावलले असल्याचे चित्र आहे.
करमाळा नगरपालिकेची एक नगराध्यक्ष व २० नगरसेवक निवडण्यासाठी १० प्रभागातून निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. निवडणूक प्रभारी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी येथे कमळ फुलवायचे हा निश्चय केला आहे. त्यानुसार सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. मात्र निकाल काय येणार हे पहावे लागणार आहे. भाजपच्या महिला प्रदेशउपाध्यक्षा रश्मी बागल, शशीकांत चव्हाण, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, तालुकाध्यक्ष रामा ढाणे, सचिन पिसाळ, शशिकांत पवार यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारांचे एबी फॉर्म निवडणूक कक्षात दिले. यावेळी मात्र ज्या उमेदवारांचे एबी फॉर्म नव्हते त्यांच्यात नाराजी दिसली.
करमाळ्यात १० प्रभागात निवडणूक होत आहे. यामध्ये सपना घोरपडे, शौकत नालबंद, गोपाल वाघमारे, माया कांबळे, निर्मला गायकवाड, ताराबाई क्षीरसागर, स्वाती फंड, अतुल फंड, जबीनबानो कुरेशी, राहुल जगताप, श्रुती कांबळे, जगदीश अग्रवाल, सुषमा कांबळे, नितीन चोपडे, सुनीता ढाणे, दीपक चव्हाण, लत्ता घोलप, सचिन घोलप, रणजित कांबळे व जबीनबानो कुरेशी यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
भाजपने या निवडणुकीत अतिशय सूक्ष्मपणे नियोजन केले असून शेवटच्याक्षणी उमेदवारांना एबी फॉर्म देऊन नावे निश्चित केली. कोणताही दगाफटका होणार नाही याची काळजी घेण्यात आली. बागल यांच्यासह विजय लावंड, सचिन घोलप, गणेश चिवटे, देवी, चव्हाण यांनी यामध्ये बारकाईने लक्ष घातले होते, असे बोलले जात आहे. सुरुवातीपासून बागल समर्थक भाजपमधील एक गट स्वतंत्र लढण्याचा आग्रह धरत होता. आता त्यांनी सर्व ठिकाणी उमेदवार दिले असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला काही जागा दिल्या जातील का हे पहावे लागणार आहे. कुरेशी यांचा मात्र दोन प्रभागात अर्ज आहे.
