Breaking : करमाळ्यासाठी BJP चा प्लॅन ठरला! पालकमंत्री गोरे, बागल, घुमरे यांच्यात बंद दाराआड चर्चा, भाजपचे कल्याणी यांच्याशी ‘कानगोष्ट’

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या प्रचार नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आज (गुरवार) पालकमंत्री जयकुमार गोरे हे बागल यांच्या बंगल्यावर आले होते. यावेळी त्यांनी निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान भाजपच्या नेत्या रश्मी बागल, मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल व ‘किंगमेकर’ विलासराव घुमरे यांच्याशी त्यांनी बंद दाराआड बराचवेळ चर्चा केली. ‘सर्वच प्लॅन उघड करायचे नसतात’ असे म्हणत या चर्चेबाबत सांगण्यात आले. त्यावरून करमाळ्यासाठी काहीतरी प्लॅन झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वतंत्र उतरले आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनीता देवी या आहेत. तर १० प्रभागातून २० उमेदवार नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीवर पालकमंत्री गोरे यांचे अतिशय सूक्ष्मपणे लक्ष आहे. त्यांचा आजचा निवडणुकीदरम्यानचा दुसरा दौरा होता. आजच्या दौऱ्याची माहिती गोपनीय ठेवण्यात आली होती. याबाबत अधिकृत कोणालाही माहिती देण्यात आली नव्हती. उमेदवार व निवडक पदाधिकारी यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

पदाधिकारी व उमेदवारांची चर्चा झाल्यानंतर त्यांनी घुमरे व बागल यांच्याशी त्यांनी बंद दाराआड चर्चा केली. यावेळी बाहेर भाजपचे कन्हैयालाल देवी, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, प्रा. रामदास झोळ, सूर्यकांत पाटील उपस्थित होते. बैठक सुरु असताना आदिनाथचे माजी अध्यक्ष धंनजय डोंगरे, मकाईचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, सतीश नीळ, आशिष गायकवाड आदी उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर पालकमंत्री गोरे, बागल व घुमरे बाहेर आले. त्यानंतर गोरे यांनी प्रा. झोळ, पाटील, देवी, चिवटे यांच्याशी चालत चालत चर्चा केली. भाजपचे निरीक्षक कल्याणी यांच्याशी त्यांनी कान गोष्ट केली. याबाबत बागल यांना विचारले तेव्हा सर्वच गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात असे मिश्कीलपणे म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *