करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी करमाळ्यात पाच ठिकाणी सभा व एक पदयात्रा झाली. आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीत या सभा झाल्या. करमाळ्यातील सभेला माजी आमदार जयवंतरव जगताप व शंभुरजे जगताप यांची उपस्थिती सोडली तर इतर ठिकाणी जगताप व बागल गटाचे प्रमुख कोणही नव्हते. चिखलठाण येथे शिंदे गटातील एकमेकांचे विरोधक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बरकुंड व बाजार समितीचे माजी संचालक चंद्रकात सरडे व बागल गटाचे मकाईचे संचालक दिनकर सरडे एका मंचावर आले होते. भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे, आरपीआयचे (ए) अर्जुन गाडे, बाळासाहेब टकले, शिवसेना महिला आघाडीच्या प्रियंका गायकवाड आदी पदाधिकारी सर्व ठिकाणी ठळकपणे दिसले.

सावडी, करमाळा, कंदर, साडे व चिखलठाण येथे त्या- त्या भागातील करकर्त्यांची उपस्थितीत या सभा झाल्या. करमाळ्यात पदयात्रा झाली. प्रमुख कार्यकर्त्यांची सभांना उपस्थिती होती. आमदार शिंदे यांचे भाषण झाल्यावर खासदार निंबाळकर यांच्या मनोगताणे समारोप होतहोता. आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून तालुक्याचा विकास करण्यावर कसा भर दिला आहे, हे सांगितले. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निंबाळकर यांना विजयी करण्याचे आवाहन करतानाच कोणावरही टोकाची टीका न करता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून विकास कामावर भर असल्याचे त्यांनी सांगितले. महेश चिवटे यांनीही महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. गाडे यांनी संविधन बदलण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.

निंबाळकर यांनी पंतप्रधान मोदी यांनी विकास कसा केला आहे. कोरोना काळात करमाळ्यातील प्रदेशात अडकलेले डॉक्टर मोदींमुळे सुखरूप आले त्यांना कशी मदत केली याची आठवण करून दिली. कोरोनामध्ये मोदींमुळे सर्वाना मोफत लस मिळाली असल्याचे सांगितले. गोरगरीब नागरीकांना मोफत धान्य, सरकारी नोकरदारला ज्याप्रमाणे पेन्शन मिळते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनाही मोदी सरकारने पेन्शन सुरू केली. दुष्काळ अनुदान प्रत्येकाच्या खात्यात जमा केले,
जल जीवन मशीन अंतर्गत प्रत्येकाच्या घरात पाणी दिले ‘हर घर नल’ सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले. करमाळा तालुक्यात रेल्वेला थांबा देण्यातही यश आले असल्याचे सांगत निंबाळकर यांच्याकडून नागरिकांची मतदान करण्याची मानसिकता करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांच्यावरही टीका केली. प्रत्येक सभेत त्यांनी मोहिते पाटील यांनी सहकारी संस्थांचे कसे नुकसान केले हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ करखानाही काही दिवस होता, मात्र तोही कारखाना अडचणीत आला असल्याचेही सांगत वातावरण निर्मिती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. येणाऱ्या दिवसात कसा बदल होतो हे पहावे लागणार आहे. प्रियंका गायकवाड यांनी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आपण निंबाळकर यांना मताधिक्य देणार असल्याचे सांगितले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *