करमाळा (अशोक मुरूमकर) : विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी करमाळा पोलिसात पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्रियंका उर्फ जागृती दशरथ साखरे (रा. राजुरी, ता. करमाळा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. यामध्ये विवाहितेच्या आईने (रा. नान्नज, ता. जामखेड) करमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून जावई दशरथ नामदेव साखरे, नंदा नामदेव साखरे, नामदेव साखरे (सर्व रा. राजुरी), नीता संतोष वाळुंजकर व संतोष वाळुंजकर (रा. वाशिंबे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुशीलकुमार पाखरे यांच्याकडे आहे.
या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘मंगळवारी (ता. ९) दुपारी २ वाजता दुसरा जावाई महेश साखरे यांचा फोन आला. त्यांनी प्रियंका आजारी आहे. तिला करमाळ्यात दवाखान्यात आणले आहे. तुम्ही सर्वजण या. त्यानंतर आम्ही करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात आलो. तेव्हा समजले की प्रियंकाने विहिरीत उडी घेतली होती. त्यासाठी तिला उपचारासाठी रुग्णालयात आणले होते. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.’
प्रियंकाचा विवाह 2019 मध्ये झाला होता. तिला ५ वर्षाचा मुलगा व दोन वर्षाची एक मुलगी आहे. २०२४ पासून तिला गुन्हा दाखल झालेल्या संशयित सासरच्या मंडळींकडून चारचाकी गाडी घेण्यासाठी जाच केला जात होता. जोपर्यंत पैसे घेऊन येत नाही तोपर्यंत घरात येईचे नाही असं म्हणून त्रास दिला जात होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.
