करमाळा (अशोक मुरूमकर) : मुलांना किडनॅप करण्याची धमकी देऊन महिलेच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून गळ्यातील एक लाख ५ हजाराचे सोन्याचे मिनीगंठण चोरल्याचा प्रकार भगतवाडी येथे भर दुपारी घडला आहे. याबाबत दोन अनोळखी संशयितांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (ता. ५) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणात किशोरी सोमनाथ जाधव (वय २५) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी जाधव यांचा दीर दौण्ड येथे जीआरपीएफमध्ये आहे. पती जिंती येथे कामानिमीत्त गेले होते. त्यांना दोन मुलं आहेत. जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘एकटी घरात काम करत असताना तोंडाला मास्क लावलेले दोन संशयित घरात आले. एकाच्या हातात हॉकीस्टिक होती. त्यांनी धरून भिंतीजवळ नेले व तोंडात कापडाचा बोळा कोंबला. मोबाईलमध्ये फोटो दाखवून दोन्ही मुलं किडनॅप केली असून दीर व पतीचे फोटो दाखवून चाकूचा धाक दाखवून एकाला मारणार असल्याची धमकी दिली. दरम्यान एकाच्या अवघड जागेवर लाथ मारून बचाव करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. तेव्हा दोघांनी पकडून गळ्यातील सोन्याचे गठन हिसकावून नेले.’ या प्रकरणात करमाळा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.
