करमाळा (सोलापूर) : जिल्हा परिषदेच्या पांडे गटात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संतोष वारे यांच्या पत्नी राणी वारे निवडणुकीत उतरल्या आहेत. विजय मिळवण्यासाठी त्यांनी ताकद लावली आहे. वारे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागात यापूर्वी कामे केली होती. तहसील व पोलिस ठाण्यातील कामांसाठी संतोष वारे हे देखील सर्वसामान्य नागरिकांना आधार ठरले आहेत. सीना नदीच्या पुरावेळी वारे यांनी या भागातील नागरिकांना मोठा आधार दिला होता. त्याचा त्यांना किती फायदा होणार हे पहावे लागणार आहे. मात्र वारे यांची संपूर्ण यंत्रणा विजयासाठी कामाला लागली आहे. कोरोना काळातही त्यांनी उल्लेखनीय काम केले होते.
वारे या जिल्हा परिषद सदस्य असताना दुष्काळ, पूर व कोविड अशी मोठी संकट आलेली होती. मात्र या संकटात त्यांनी हार न मानता नागरिकांना मदत केली. संतोष वारे यांनी कोरोना काळात नागरिकांना आधार देण्यासाठी कोव्हीड सेंटर उभारले होते. त्यामाध्यमातून अनेकांना त्यांनी मदत केली. याशिवाय अनेक गोरगरिबांना त्यांनी किराणा किट दिले होते. दुष्काळ काळात काही ठिकाणी त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून दिले होते. त्यातून अनेकांची तहान भागवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. राजकारण न करता त्यांनी सरकारच्या योजना सामान्य नागरिकांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
सप्टेंबर व ऑक्टोबर २०२५ मध्ये सीना नदीला आलेल्या महापुरावेळी त्यांनी खडकी, आळजापूर, बिटरगाव श्री, निलज आदी गावात भेटी देऊन पूरग्रस्तांना आधार दिला होता. एकाही नागरिकाला हानी झाली नाही पाहिजे या भावनेतून वारे यांनी प्रशासन व नागरिक यांच्यात उत्तम संवाद ठेऊन काम केले. संगोबा येथील मंदिरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी स्वतःच जीव धोक्यात घातला होता. त्यानंतरही त्यांनी पुरसग्रत नागरिकांना स्थलांतर केलेल्या ठिकाणी सेवा देण्याचा प्रयत्न केला होता. वारे यांचा या भागात मोठा संपर्क आहे. त्याचा किती फायदा होणार हे पहावे लागणार आहे.
पांडे गटात चौरंगी लढत…
पांडे जिल्हा परिषदेच्या गटात चौरंगी लढत होत आहे. येथे भाजपच्या रश्मी बागल, शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या राणी वारे, राष्ट्रीय समाज पक्षच्या गुणाबाई रंदवे व करमाळा तालुका विकास आघाडीच्या ज्योती सावंत हे उमेदवार आहेत.
पांडे गटात कोणती गावे येतात?
पांडे गटात ३५ हजार ५५६ मतदान आहे. यामध्ये पुरुष १८ हजार ६६० व महिला १६ हजार ८९६ मतदार आहेत. यामध्ये रावगाव व पांडे असे दोन गण आहेत. यातील रावगाव गणात रावगाव, भोसे, लिंबेवाडी, वडगाव, पुनवर, जातेगाव, खडकी, आळजापूर, कामोणे व मांगी. तर पांडे गणात पांडे, खांबेवाडी, धायखिंडी, पोथरे, निलज, बिटरगाव श्री, बोरगाव, घारगाव, पाडळी, पोटेगाव, बाळेवाडी, देवीचामाळ, तरटगाव, दिलमेश्वर व वडाचीवाडी. ही गावे आहेत.
