करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘तुम्ही फक्त गावखेड्यातील विकासासाठी कामाचे नाव सांगायचे, ग्रामविकास मंत्री म्हणून मी ते पूर्ण करणार’, असे अश्वासन देत ‘मांगीचे पाणी कोठेही नेऊ देणार नाही. रितेवडीसंदर्भात बैठक झाली असून विकास करण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) सर्व उमेदवारांना विजयी करा’, असे आवाहन ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वीट येथे केले. येथील सभेतून त्यांनी गणेश चिवटे यांच्या पत्नी अश्विनी चिवटे यांच्यासह भाजपच्या व राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.
करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरलेल्या भाजप व राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) उमेदवारांसाठी पालकमंत्री गोरे यांनी आज (सोमवार) सभा घेतली. माजी आमदार जयवंतराव जगताप यांचीही त्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, पांडे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार रश्मी बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शंभूराजे जगताप, मकाईचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, सतीश नीळ, भाजपचे तालुकाध्यक्ष रामा ढाणे आदी उपस्थित होते.
वीट येथे स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सभेची सुरुवात झाली. मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी प्रास्ताविक केले. पालकमंत्री गोरे म्हणाले, ‘करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करा. ग्रामविकास विभागाकडून निधीची कमतरता पढू देणार नाही. ग्रामविकास विभागाकडून सर्व प्रश्न सोडवण्यासाठी थेट निधी दिला जाईल. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसह गावाच्या विकासातील रस्ते, गटार, घरकुल आदी सर्व कामे ग्रामविकासकडून होतात. मोठ्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही निधी दिला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही आपल्याला निधी दिला जाईल’, असे अश्वासन त्यांनी दिले.
पुढे बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले, ‘सत्तेच्या विरुद्ध असलेले आमदार येथे विजयी केले आहेत. मात्र विकासावर त्याचा परिणाम होत आहे. सत्तेच्याविरुद्धचा लोकप्रतिनिधी असेल तर विकासाचा दुष्काळ पडतो’, असे म्हणत पालकमंत्री गोरे यांनी आमदार नारायण पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला. ‘सत्तेच्या विरोधातील सदस्य विजयी झाला तर त्याला निधी मिळणार नाही’, असेही त्यांनी सांगितले. ‘सध्या येथे सत्तेच्या विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे विकास कामांचा दुष्काळ आहे. हा दुष्काळ आपल्याला हटवायचा असेल आणि सुकाळ आणायचा असेल तर आणि आपल्या गावखेड्यातील कामे करायची असतील तर भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करा’, असे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी केले. येथे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याबरोबर युती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘तुम्ही फक्त कामाचे नाव सांगायचे ते मी ग्रामविकास मंत्री म्हणून पूर्ण करणार’, असे सांगतानाच पालकमंत्री गोरे म्हणाले, ‘मांगी तलावातील पाणी हे मांगीच्या हक्काचे आहे. ते सहजासहजी कोणालाही नेऊ दिले जाणार नाही. ज्या भागाला नव्याने पाणी पाहिजे तेथे नव्याने पाणी उपलब्ध करू. रिटेवाडी संदर्भात बैठक झाली आहे. शेतीला पाणी देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विकास केला जात आहे. सरकारने शेतकऱ्यांचे पाच वर्षाचे वीज बिल माफ केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आता शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा शब्द दिला आहे. तोही शब्द जून- जुलैमध्ये कर्ज माफ करून करणार आहोत. कुकडीचे आवर्तन, रस्ते, वीज हे प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारांना विजयी करा. लाडक्या बहीण योजनेचे सर्वांना पैसे मिळत आहेत असेही त्यांनी विचारले. विरोधी पक्षच्या उमेदवारांना विकासाला निधी कोठून आणणार हे विचारा’, असेही त्यांनी सांगितले.
