करमाळा (अशोक मुरूमकर) : आमदार नारायण पाटील यांच्याबरोबरची युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आज (बुधवार) पहिल्यांदाच जाहीर भाषण केले. यामध्ये भाजपच्या नेत्या रश्मी बागल यांचा लेक म्हणून तर बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांचा धाकटे पवार असा उल्लेख केला. ‘आमदार पाटील यांनी देशाचे नेते शरद पवार व मोहिते पाटील यांच्यासमोर दिलेला शब्द पाळला नाही’, असे म्हणत त्यांच्याबरोबर कशामुळे भिनासलं हे पहिल्यांदाच स्पष्टपणे सांगत टीका केली आहे. त्यांच्या भाषणात शरद पवार व अजित पवार यांचा सर्वाधिकवेळा उल्लेख झाला. भाषणदरम्यान अजान सुरू झाल्यानंतर भाषण थांबवून आपण सर्वधर्मसमभाव पाळत आलो आहोत असे सांगितले. भाषणाच्या शेवटी ‘कमळ’ व ‘घड्याळ’ चिन्हावरचे उमेदवार विजयी करण्याचे आवाहन जगताप यांनी केले.
जिंती येथे मोहिते पाटील समर्थक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी माजी आमदार जगताप हे प्रमुख उपस्थित होते. बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष गुळवे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्यासह बागल व माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटातील, भाजप, राष्ट्रवादीसह सवितादेवी राजेभोसले यांचे समर्थक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
माजी आमदार जगताप म्हणाले, ‘मी संजयमामा शिंदे यांना सोडत नव्हतो. मात्र त्यांच्यातील काही कार्यकर्ते वेगळी माहिती सांगत होते. तेव्हा आमदार नारायण पाटील हे देखील माझ्याकडे पाठिंब्याची मागणी करत होते. मात्र आमदार झाल्यानंतर ते प्रमाणिक राहिले नाहीत. त्यांना आमदार करण्यासाठी मी व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पाठवले. तेव्हा मोहोळचे रमेश कदम हे देखील उपस्थित होते. शरद पवार यांच्या समोर आदिनाथ कारखाना माझ्याकडे देईचा ठरल होते. स्व. आजित पवार हे देखील कारखान्याला मदत करण्यासाठी तयार झाले होते. जिल्हा परिषद व पंचयात समितीच्या निम्या जागा देखील मला देणार होते. मात्र पाटील यांनी शब्द पाळला नाही. ते आमच्याशी प्रमाणिक राहिले नाहीत. त्यांनी पुढे बोलणे टाळले’, असे म्हणत आमदार पाटील यांच्यावर त्यांनी घणाघात केला.
