पांडे गटात वारेंच्या पराभवाची का होतेय चर्चा?

करमाळा (अशोक मुरूमकर) : जिल्हा परिषदेच्या निवडणुक रिंगणात पांडे गटातून माजी सदस्या राणी वारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उतरल्या होत्या मात्र त्यांचा पराभव झाला असून तिसऱ्या स्थानावर गेल्या. या गटात भाजपच्या रश्मी बागल विजयी झाल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानावर आमदार नारायण पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडीच्या ज्योती सावंत राहिल्या आहेत. येथे तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या वारे यांची मते लक्षणीय असून त्यांच्या पराभवाची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

राणी वारे या राष्ट्रवादीचे (शरद पवार) जिल्हा सरचिटणीस संतोष वारे यांच्या पत्नी आहेत. या गटातून त्यांनी २०१७ मध्ये म्हणजे गेली जिल्हा परिषद निवडणूक बागल गटाकडून लढवली होती. त्यात त्यांचा विजयी झाला होता. त्यानंतर बागल आणि वारे यांच्यात मतभेद झाले होते. दरम्यानच्या काळात अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. मात्र त्यातही निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली होती आणि अखेर त्या निवडणुकीत उतरल्या. परंतु त्यांचा पराभव झाला. भाजपच्या बागल विजयी झाल्या असल्या तरी वारे यांच्या पराभवाची मोठी चर्चा होताना दिसत आहे.
वारेंनी लावली ताकद! पांडे गटात घरोघरी भेटीवर भर, सिनेचा पूर, कोरोनात केलेल्या मदतीचा होणार फायदा?

१) या निवडणुकीत वारे यांची एकाकी लढत होती. त्यांच्यामागे कोणीही तालुक्यातील स्थानिक नेते नव्हते. निवडणुकीत उतरण्यासाठी वारे यांनी आमदार पाटील यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. जेऊर येथे झालेल्या मुलाखतीमध्ये देखील त्यांनी मुलाखत दिली होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. येथे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऍड. राहुल सावंत यांच्या पत्नी ज्योती सावंत यांना उमेदवारी मिळाली.

२) वारे यांनी उमेवारी मागितीली तेव्हा मोहिते पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप व आमदार पाटील एकत्र होते. माजी आमदार जगताप हे देखील वारे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या आधीच त्यांच्यात मतभेद झाले आणि आमदार पाटील यांनी करमाळा तालुका विकास आघाडीचे उमेदवार जाहीर केले. त्यात सावंत यांचे नाव निश्चित झाले.

३) वारे हे सुरुवातीपासून ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी आग्रही होते. त्यांनी जगताप व मोहिते पाटील यांच्याकडे त्यासाठी फिल्डिंग लावली होती. आणि त्यांना उमेदवारी मिळाली देखील. पुढे वारे यांनी केलेल्या कामाच्या जोरावर प्रचार केला. त्यांच्या प्रचारासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील व खासदार निलेश लंके यांनीही सभा घेतल्या.

४) प्रचार सुरु झाल्यानंतर वारे यांनी त्यांच्या पत्रकावर माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा फोटो वापरला होता. जगताप हे वारे यांच्याबरोबर राहतील, अशी शक्यता होती. मात्र जगताप यांनी भाजप (बागल) व राष्ट्रवादी (अजितदादा गट, माजी आमदार संजयमामा शिंदे) यांना पाठींबा देऊन पांडे गटात ‘माझी लेक रश्मी बागल’ यांना विजयी करण्याचे आवाहन जगताप यांनी केले होते. जगताप यांची मदत वारे यांना झाली असती तर त्यांची मते वाढली असती. एकट्याने लढून त्यांना मिळालेली मते हा चर्चेचा विषय ठरला आहे.

५) वारे यांनी निवडणूक लढवण्याचे टार्गेट ठेऊन गटात काम केले होते. कोरोना काळात त्यांनी उल्लेखनीय काम केले होते. याशिवाय टंचाईच्या काळात त्यांनी टँकरने मोफत पाणी पुरवठा केला होता. याशिवाय सीना नदीला आलेल्या महापुरावेळी त्यांनी अनेकांना मदत केली होती. त्यामुळे त्यांचा जनाधार वाढला. त्याचे रूपांतर मतात झाले. मात्र विजयापर्यंत गेले नाही. त्यांना स्थानिक नेत्याची मदत मिळाली असती तर त्यांचा विजय झाला असता अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

वारे व बागल यांच्यात मतभेद झाल्यानंतरही त्यांचे काम सुरूच होते. बागल यांनी अखंड राष्ट्रवादी सोडल्यानंतरही वारे हे राष्ट्रवादीत राहिले होते. पुढे एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या तरी वारे यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोहिते पाटील यांना विजयी करण्यासाठी काम केले. तर विधानसभा निवडणुकीत पाटील यांना विजयी करण्यासाठी काम केले. दरम्यान शरद पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेटही दिली होती. सुप्रिया सुळे, खासदार मोहिते पाटील यांच्याकडेही त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी पाठपुरावा केला होता. त्यांना उमेदवारी मिळाली मात्र स्थानिक पातळीवर ते एकटे पडले होते. त्यांना उमेदवारीसाठी डावलण्यात येत होते. मात्र यांनी मिळवलेली मते हा सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *