करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतरची पहिली सर्वसाधारण सभा (जीबी) सोमवारी (ता. २३) होणार आहे. या सभेत अनेक दिवसांपासून लक्ष लागलेला हद्दवाढीचा विषय गाजण्याची शक्यता आहे. प्रत्येक नगरसेवकाचे दोन विषय या सभेत घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली असून नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिली सभा असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
करमाळा नगरपालिकेत अनेक दिवसांपासून प्रशासक होते. प्रशासक कालावधी दरम्यान माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या काळात विकास आरखडा सादर करण्यात आला होता. त्यांच्या काळात निधी देखील उपलब्ध झाला होता, असे शिंदे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. आता होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हद्दवाढ हा विषय महत्वाचा समजला जात आहे. नगरपालिकेच्या २० नगरसेवकांनी मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्याकडे विषय सुचवले असून प्रत्येकी दोन महत्वाचे विषय अजेंड्यावर घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
करमाळा शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात अनेक अडचणी आहेत. त्यामुळे त्यांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत. करमाळा नगरपालिकेची हद्द नसल्याने पालिका सुविधा देऊ शकत नाही. मात्र आता हद्दवाढीचा विषय अजेंड्यावर येणार असून त्याला मान्यता दिली जाते का हे पहावे लागणार आहे. ठराव मंजूर झाल्यानंतरही त्यावरील हरकती व त्याची सुनावणी आणि त्यानंतर सरकारकडून मंजुरी अशी त्याची प्रक्रिया होणार आहे. मात्र सध्या हा विषय चर्चेत येणार असल्याने अनेकानी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. हद्दवाढीमुळे नागरिकांना गटारी, पाणीपुरवठा, रस्ते, वीज आदी मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. याबाबत नगरसेविका स्वाती फंड यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे पत्रही दिले आहे.
गटारी, रस्ते, पाणी देण्याची मागणी
करमाळा नगरपालिके नगराध्यक्ष व २० नगरसेवक आहेत. नगरपालिकेत करमाळा विकास आघाडीच्या सावंत या नगराध्यक्षा आहेत. तर भाजपचे अतुल फंड हे उपनगराध्यक्ष आहेत. माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे समर्थक शिवसेनेचे (शिंदे गट) नगरसेवक प्रशांत ढाळे हे विरोधी पक्षनेते आहेत. नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेसाठी सुचवलेल्या विषयांमध्ये बहुतांश विषय हे प्रभागात रस्ते, गटारी व पाण्याबाबत असल्याची माहिती मिळाली आहे.
