Article written by Vivek Yevle on the occasion of Vilasrao Ghumre birthday

गेल्या तीसेक वर्षांपासून शहर व तालुक्यात चांगल्या- वाईट लोकापवादामुळे सदैव चर्चेत असलेलं आणि राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण, उद्योग आदी सर्वच क्षेत्र आपल्या कर्तबगारीनं कमी अधिक प्रमाणात व्यापून टाकणारं ‘सर’ नावाचं गारूड आज 6 फेब्रुवारीला एकोंसत्तर ओलांडतय अन तेही तीच विलासी, वादग्रस्त पण समाजमनावर गारूड घालणारी रुबाबदार प्रतिमा ऐटीत मिरवत!

काही माणसं जन्माला येतानाच डाॅमिनेटिंग आणि रुबाबदार व्यक्तीमत्व घेऊन अवतीर्ण होतात. सर हे त्यातलं एक ठळक उदाहरण होय! अतिशय सामान्य कुटुंबात जन्माला येऊन हलाखीचं अभावग्रस्त लहानपण जगलेल्या सरांनी शिकत असताना लहानपणापासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच आपल्या दिलदार वृत्तीमुळे, कुठल्याही बाबतीत झोकून देण्याच्या अंगभूत प्रवृत्तीमुळे मित्रपरिवाराचा जो गोतावळा गोळा केला त्यामध्ये आजदेखील दिवसेंदिवस वाढच होते आहे. खिळाडूवृत्ती असलेल्या सरांनी महाविद्यालयात शिकत असताना विविध क्रिडा व अन्य क्षेत्रात नैपुण्य तर दाखविलेच पण याच दरम्यान परिस्थितीची गरज ओळखून वि. का. सेवा सह. सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून नोकरी केली आणि पदवीधर होताच त्याच चव्हाण महाविद्यालयात क्लार्क म्हणून नोकरी पत्करली. आणि येथून पुढेच त्यांच्या अभ्युदयाचा काळ हळूहळू सुरू झाला.

अंगभूत गुणांमुळे त्यांनी तत्कालीन संस्थाचालकांची मर्जी व विश्वास संपादन करून काही काळातच महाविद्यालयाच्या व्यवस्थापन व प्रशासनावर आपली पकड निर्माण केली व त्यांच्या अंगभूत कौशल्य व चाणाक्षपणामुळे पुढे कालांतराने ही शिक्षणसंस्था पूर्णपणे त्यांच्या अधिपत्याखाली आली आणि त्यांनी कुशल नियोजनातून या संस्थेचा पूर्ण कायापालट केला.

महाविद्यालयात कायमस्वरूपी नोकरी मिळाल्यानंतर हळूहळू आर्थिक व कौटुंबिक स्थैर्य लागल्यानंतर सुरूवातीला कै. नामदेवरावजींच्या सानिध्यात राजकारणातले डावपेच शिकलेले वा जाणून घेतलेले सर पुढे यात इतके पारंगत झाले की गेल्या 25- 30 वर्षांपासून बर्‍याच वेळेला आमदार कोणाला करायचे हे त्यांच्या नियोजन व चाणक्यनितीवर अवलंबून त्यानुसार ठरत व होत गेले आणि करमाळा तालुक्याच्या राजकारण, समाजकारणादी सर्वच क्षेत्रांमध्ये ‘सर’ हा परवलीचाच शब्द ठरत गेला. हे सर्व करत असताना महत्वाचं म्हणजे ‘सबका साथ.. सबका विकास’ या त्यांच्या व्यापक भूमिकेमुळे त्यांच्यामुळे अनेकांचं हित झालं! आपलं भागलंय ना मग बाकीच्यांचं काय घेणं- देणंय आपल्याला… ही संकुचित व आत्मकेंद्रित वृत्ती नसलेल्या सरांनी परिवारातील व बहुजन समाजातील अनेकांना जगण्याची दिशा तर दिलीच परंतु कायमस्वरूपी रोजगार, नोकर्‍या मिळवून दिल्या हे त्यांच्या आयुष्यातले फार मोठे संचित आहे.

सर हे लौकिकार्थाने शिक्षक नसले तरी त्यांच्या उक्ती, वृत्ती व कृतीतून ते अनेकांच्या दृष्टीने केवळ गुरूच नव्हे तर ‘दीपस्तंभ’ ठरलेले आहेत. अर्थात ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्ती व स्वार्थी मानवी वृत्तीनुसार बर्‍याच जणांनी जरी त्यांना कृतघ्नतेची गुरूदक्षिणा दिलेली असली तरी त्याचे वैषम्य वाटू न देता ते आजदेखील निरपेक्ष वृत्तीने कार्यरत आहेत पण तरीदेखील हा सल त्यांच्या मनात निश्चितच कुठेतरी जाणवत असणारच! पण त्यांच्यातल्या अनेक गुणांपैकी स्थितप्रज्ञता हाही एक महत्त्वाचा गुण आहे, असो…

सरांमुळे किती जणांच्या आयुष्याचं, किती जणांचं राजकीय तर किती जणांचं लायकी नसताना कोटकल्याण झालं ही जंत्री मला ठाऊक आहेच तशीच ती सर्वश्रुत आहे. परंतु ते तपशीलात लिहिणं या निमित्ताने अप्रस्तुत आहे. मला जसं आठवतंय तसं मी त्यांना ओळखतोय आणि त्यांचा आजवरचा संघर्षमय मात्र सर्वार्थाने यशस्वी ठरलेला कमालीचा जीवनप्रवास मी आधी लांबून आणि गेल्या जवळपास तीस वर्षांपासून जवळून पाहिलाय. काही निमित्ताने माझी व त्यांची जवळीक व दाट मैत्री झाली व त्यानंतर पुढील जवळपास १५ वर्षे आम्ही एकाच प्रवाहात एकजीवाने व निर्भेळपणे एकत्र राहिलो. पुढे काही कारणास्तव आमच्यात राजकीय व त्यातून वैचारिक दुरावा निर्माण झाला व आजदेखील हे मतभेद कायम असले तरी मनभेद कधी झाले नाहीत आणि होऊही शकणार नाहीत. त्याचं कारण मी जसा त्यांचा संघर्ष पाहिलाय तसंच त्यांनी देखील माझी परिस्थितीवश निर्माण झालेली अगतिकता केवळ मित्र म्हणून नव्हे तर मोठ्या भावाच्या अन वडिलकीच्या नात्याने वेळोवेळी जाणून घेतलीय. त्यामुळे आजदेखील मी ज्या- ज्या नात्यांना पारखा झालोय ती सारी नाती त्यांच्यात पाहतो, अनुभवतो आणि मला लाभलेल्या या सर्वपरिपूर्ण गुरूचा मनोमन सदैव आदरच जपतो आणि कधी अगदीच काही असह्य झालं तर एक वडीलधारे हक्काचं ठिकाण म्हणून फक्त त्यांच्याजवळच व्यक्त होऊ शकतो!

आजवरच्या माझ्या आयुष्यात इतका अष्टावधानी, प्रचंड आकलन व अचूक निर्णयक्षमता, कुठल्याही परिस्थितीतून योग्य मार्ग काढण्याची कुवत असलेला, हजरजबाबी, मिश्किल वृत्ती पण त्याचवेळी आदरयुक्त दबदबा व दरारा निर्माण केलेला, शून्यातून विश्व निर्माण केलेला सरांसारखा माणूस अगदी क्वचितच पाहिला व अनुभवलेला आहे. सरांचं मला भावलेलं आणखी एक विशेष हे की हा माणूस समाजाच्या सर्व थरांत जितक्या समरसतेने अन समरसून वावरतो तितक्याच निर्विकार अलिप्तपणे स्वतःचं वेगळेपण जोपासत असताना आपल्यातलं माणूसपण मात्र मरू देत नाही आणि त्याचवेळी स्वतः ला कुठेही प्रवाहपतित होऊ देत नाही!

जन्मःताच लाभलेलं चुंबकीय व्यक्तीमत्व हे त्यांना लाभलेलं नैसर्गिक वरदान मानावं लागेल कारण त्यांच्या जवळ गेलेला आणि बर्‍यापैकी बुद्यांक पातळी असलेला माणूस त्यांच्या आजन्म प्रेमात पडल्यावाचून रहात नाही. इतकं संघर्षमय, वादग्रस्त परंतु सर्वार्थाने यशस्वी आयुष्य जगलेला हा माणूस स्वतःच्या सार्थ कर्तबगारीनं ‘किंगमेकर, मास्टर- माईंड, संघर्ष-योध्दा, मार्गदर्शक’ अशा जनमाणसाने उत्स्फूर्तपणे दिलेल्या पदव्या मिरवताना आजवर कधीही हुरळून न जाता सदैव जमिनीवर पाय ठेवूनच जगत आलेला आहे हे त्याचे आणखी एक आगळेवेगळेपण आहे. आता एकोंसत्तर ओलांडत असलेल्या सरांनी आजवरच्या धकाधकीच्या आयुष्यात दैनंदिन जीवनात जपलेला नियमितपणा व आचारांवरील काटेकोरपणे जपलेल्या मर्यादा यामुळे उत्तम आरोग्य जोपासून सर्वच दृष्टीने तृप्त कौटुंबिक आयुष्य जगण्याचं नशीब त्यांना लाभलंय. पण त्याचबरोबर हा माणूस आजन्म बहुजनांचा आधारवड, दीपस्तंभ व होकायंत्र म्हणून कार्यक्षमपणे कार्यरत राहील एवढे मात्र नक्की! आदरणीय विलासराव घुमरे सरांनी शतायुषी व्हावे… हीच या निमित्ताने शुभकामना..!

  • विवेक येवले, करमाळा

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *