राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्या : माजी आमदार जगताप

करमाळा (सोलापूर) : बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केली आहे. एका समविचारी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले आहे.

मे मध्ये विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या नऊ जागा रिक्त होत आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या समाजकारण व राजकारणात संघर्ष यात्री व विकासात्मक नेतृत्व म्हणून राऊत यांच्याकडे पाहिले जाते. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काही अपप्रचारामुळे त्यांचा पराभव झाला. तेथील सुजाण नागरिकांनी बाजार समिती, नगरपालिका व जिल्हा परिषद- पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चूक दुरुस्त करत राऊत यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व समविचारी नेत्यांचे समन्वयक म्हणून त्यांची जिल्हाभरात ओळख आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करताना राऊत यांच्यासारखे नेतृत्व नाउमेद होऊ नये व त्यांना अधिक कार्यक्षमतेने काम करता यावे, याकरिता मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये रिक्त होणाऱ्या जागेवर त्यांना संधी द्यावी, अशी मागणी फडणवीस यांची भेट घेऊन करणार असल्याची माहिती माजी आमदार जगताप यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *