श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील खड्डे बुजवण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे येणाऱ्या पाचही रस्त्यावर गतिरोधक बसवून परिसरातील खड्डे बुजवावेत अशी मागणी नगरसेविका निर्मला गायकवाड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्याधिकारी सचिन तपसे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पाच बाजूने रस्ते येतात. या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. शिवाय गतिरोधकांची देखील आवश्यकता आहे.

जुना बायपास रोड डॉ. लावंड हॉस्पीटल समोर, श्री देवीचा रोड मारुती मंदिर समोर, भवानी पेठकडून येणारा रस्ता राखुंडे हॉटेल, एसटी बस स्थानकाकडून येणारा रस्ता माळवे घरा समोर व दत्त पेठ येथून येणारा माने यांच्या घरासमोर अश्या पाच ही बाजूला रस्त्यावर गतीरोधक करण्यात यावे. श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोरील रस्त्यावरचे खड्डेही बुजविणे आवश्यक आहे.

करमाळा बस स्थानकाकडून अहिल्यानगरकडे जाणारा रस्ता व भवानी पेठेतून श्री कमलाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची रहदारी असते. या चौकात सतत छोटे- मोठे अपघात होत आहेत. शहरातील नागरिकांची श्री कमलादेवी मंदिर येथे दर्शनासाठी सतत येणे- जाणे असते. या भागात कन्या प्रशाला, अण्णासाहेब विद्यालय आहे. करमाळा- अहिल्यानगर जुना बायपास रोडवर प्रचंड प्रमाणात वाहनांची वाहतूक असते. त्यामुळे गतीरोधक करण्यात आल्यास अपघात होणार नाहीत. नगरपालिकेने त्वरित श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाचही बाजूला गतीरोधक बसविण्यात यावेत व खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी नगरसेविका गायकवाड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *