करमाळा (अशोक मुरूमकर) : जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीची व नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ग्राम ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी हा कार्यक्रम जाहीर केला असून ४ मे २०२६ रोजी निवडणूक आयोगाने मंजूर दिल्यानंतर जिल्हाधिकारी अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार आहेत.
पहिल्या टप्प्यात २० फेब्रुवारीला तहसीलदार गुगलअर्थचे नकाशे सुपर इमेजवरून गावाचे नकाशे अंतिम करणार आहेत. २७ फेब्रुवारीला संबंधित गावचे तलाठी व ग्रामसेवक संयुक्त स्थळ पहाणी करून प्रभाग पाडणे व सीमा निश्चित करणार आहेत. त्यानंतर ५ मार्चला तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीने प्रारूप प्रभागरचनेची तपासणी केली जाणार आहे. त्यामध्ये गटविकास अधिकारी व मंडळ अधिकारी यांचा समावेश असणार आहे. याचा अहवाल समिती उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना ११ मार्चला मान्यतेसाठी पाठवणार आहे. १७ मार्चला जिल्हाधिकारी हा प्रारूप प्रभाग रचनेचा अहवाल राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे पाठवणार आहेत. २३ मार्चला राज्य निवडणूक अयोग किंवा प्राधिकृत केलेले अधिकारी प्रस्तावास मान्यता किंवा दुरुस्ती देणार सुचवणार आहेत. त्यानंतर ३० मार्चला तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समिती मान्यता देणार आहे.
दुसऱ्या टप्यात प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागवल्या जाणार आहेत. ७ एप्रिलला प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर १३ एप्रिलपर्यंत त्यावर हरकती व सूचना घेतल्या जाणार आहेत. १६ एप्रिलला उपविभागीय अधिकारी यांच्यापुढे याची सुनावणी होणार आहे. २१ एप्रिलला प्राप्त हरकतीवर सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर २३ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांकडे याचा अहवाल पाठवला जाणार आहे.
तिसऱ्या टप्यात २८ एप्रिलला उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगास सादर करणार आहेत. त्यानंतर ४ मे रोजी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या प्रभाग रचनेला प्रसिद्धी देणार आहेत.
