करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वडगाव उत्तर येथे पुन्हा बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला करून फस्त केले आहे. हा प्रकार आज (गुरुवारी) दुपारी १२ वाजताच्या सुमारास समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा या भागात वावर आहे. त्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे. मात्र अजूनही तो त्यात सापडलेला नाही. आज बिबट्याने मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर यांच्या वस्तीवर असलेल्या कुत्र्यावर हल्ला केला आहे. हे कुत्रं गायब झाले होते. त्याचा शोध सुरु असताना ४०० मीटरवर त्याचे मृत शरीर सापडले. त्याच्या परिसरात ठसेही आहेत, असे भांडवलकर यांनी सांगितले आहे. या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
