करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील विविध मागण्यासाठी सावंत गटाने माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून निवेदनाद्वारे निधीची मागणी केली आहे. सावंत गटाचे नेते सुनील सावंत, मराठा राज्य समन्वयक महेश डोंगरे, नगरसेवक संजय सावंत, नगरसेवक रवींद्र जाधव, दादासाहेब इंदलकर, अमोल परदेशी, विनोद महानवर आदी यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, करमाळा शहराअंतर्गत रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. हे रस्ते चांगले करण्यासाठी निधी मिळावा. जुना बायपास रस्ता, पुणे रस्त्यावरील काही ठिकाणे तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते होटकर पूल याबरोबरच शहरातील अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत. संगम चौक ते पोथरे नाका, जय महाराष्ट्र चौक ते डवरी गल्ली, खडकपुरा तसेच खंदक रोड, किल्ला वेस ते नागोबा मंदिर आदी रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे.
उजनीत मुबलक पाणी असतानाही पाणीपुरवठ्याच्या सदोष यंत्रणेचा फटका करमाळ्यात बसत आहे. ही यंत्रणा सुधारण्यासाठी नगरुत्थान योजनेमधील या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळावी. करमाळा शहरातील नऊ महापुरुषांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध व्हावा. त्याबरोबर स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण होत आहे. आरोग्याचा विषय महत्त्वाचा असल्याने त्यासाठी लागणारे भुयारी गटार योजना महत्त्वाकांक्षी असून यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनामध्ये केली आहे.
