करमाळा (सोलापूर) : मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिन्याला पवित्र मानलं जातं! मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने अनेक समाजबांधव या महिन्यात रोजा (उपवास) करतात. अशातच, केवळ सहा वर्षाच्या मोईन राजू बागवान या चिमुकल्याने कशाचीही तमा न बाळगता आपला पहिला रोजा पूर्ण केला आहे. त्याच्या या जिद्दीचे आणि धार्मिक ओढीचे कौतुक होत आहे.
मार्चमधील कडक ऊन आणि वाढता पारा पाहता मोठ्या माणसांनाही रोजा धरणे कठीण जात आहे. मात्र, सहा वर्षाच्या मोईन राजू बागवानने रोजाचा संकल्प केला. आणि दिवसभर तहान भूक विसरून त्याने नियमितपणे नमाज पठण केले आणि संध्याकाळी ‘इफ्तार’च्यावेळी उपवास सोडला. त्याच्या या जिद्दीमुळे कुटुंबियांकडूनही आनंद व्यक्त केला जात आहे. त्याच्या ठाम निश्चयामुळे पालकांनी त्याला प्रोत्साहन दिले. इफ्तारच्या वेळी घरात आनंदाचे वातावरण होते. लहानपणापासूनच त्याला घरात धार्मिक वातावरण मिळाले आहे. त्याने स्वतःहून रोजा धरण्याची इच्छा व्यक्त केली आणि तो यशस्वीपणे पूर्ण केला, याचा आम्हाला अभिमान असल्याचे वडील राजू बागवान यांनी सांगितले आहे.
