करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरणातील अतिक्रमणाबाबत शेतकऱ्यांना नोटीसा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. याबाबत आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले होते. तर करमाळा तालुक्यात उजनी धरण संघर्ष समितीने आंदोलन करण्याची तयारी केली होती. अखेर मंत्रालयात याबाबत बैठक होऊन गाळपेरीच्या जमिनी सरकार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आमदार पाटील यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.
‘शेतकरी कसत असलेल्या उजनीकाठच्या जमिनीवरील कोणत्याही प्रकारे अतिक्रमण काढणार नसल्याचे’ जलसंपदामंत्री विखे पाटील यांनी या बैठकीत जाहीर केले. मुंबईत मंत्रालय येथे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उजनी धरणातील गाळपेर, अतिक्रमणसंदर्भात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत उजनी धरणग्रस्त कसत असलेल्या गाळपेर जमिनी सरकार घेणार नाही व कोणत्याच गाळपेर कसत असलेल्या शेतकऱ्यांवर अन्यान कारणार नसल्याचे बैठकीत जाहीर केले. या बैठकीला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार पाटील, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार राहुल कुल, रणजित शिंदे, प्रवीण माने यांच्यासह इंदापूर, करमाळा व दौंड भागातील धरणग्रस्त शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
