चिमुकल्या वैज्ञानिकांना ‘एआय’चे भुरळ! नगरपालिकेच्या साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींच्या शाळेत १९० विज्ञान प्रयोग

करमाळा (अशोक मुरूमकर) : वेळ सकाळी सातची… ठिकाण नगरपालिकेची साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नंबर १… चिमुकल्यांची एकच धावपळ… कोणाच्या हात रंगीबेरंगी कागदाचे तुकडे तर कोणाच्या हातात घराची, शेतातील पिकांची प्रतिकृती… काहींच्या हातात तर पुष्ट्यांपासून साकारलेल्या वेगवेगळ्या कलाकुसरी… आपण साकारलेला प्रयोग इतरांपेक्षा कसा सरस असेल हा विचार मनात रेंगाळतानाच शेजारच्या मैत्रिणीने काय प्रयोग साकारला याची कुतुहुलता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्याला निमित्त होते जागतिक महिला दिन व विज्ञान प्रदर्शनाचे! हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी व्हावे यासाठी शिक्षकांचे परिश्रम दिसून आले. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे व पालकांचे स्वागत करणे आणि चिमुकल्या मुलींना प्रयोग मांडण्यासाठी मदत करणे याची सर्व जबाबदारी योग्यरीत्या शिक्षकांनी पार पडली.

नगरपालिकेची साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नंबर १ येथे आज (मंगळवार) महिला दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन झाले. यामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थींनी तब्बल १९० वेगवेगळे प्रयोग साकारले होते. यातील ‘सेंद्रीय शेती’, ‘शेतीतील एआय तंत्रज्ञानचा वापर’, ‘चांद्रयान ३’, ‘पवन चक्की’ असे एकना अनेक चिमुकल्या वैज्ञानिकांनी साकारलेल्या प्रयोगांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांच्या हस्ते या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन झाले. उपनगराध्यक्ष अतुल फंड, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील, नगरसेवक संजय सावंत, सचिन घोलप, नगरसेविका स्वाती फंड, अश्विनी अब्दुले, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या माधुरी पवार, शीतल माने, दीपाली बोकन, सारंग परदेशी आदी उपस्थित होते. चिमुकल्या विद्यार्थिनींनी साकारलेल्या प्रयोगामध्ये ‘एआय’वर भर असल्याचे दिसले. विद्यार्थिनींच्या कल्पनांना वाव मिळावा या उद्देशाने हे विज्ञान प्रदर्शन घेण्यात आल्याचे मुख्याध्यापक चौधरी यांनी सांगितले. तर सर्व विद्यार्थिनींचे कौतुक नगराध्यक्षा सावंत यांनी केले.

विज्ञान प्रदर्शन यायस्विरीत्या पार पडावे यासाठी मुख्याध्यापक दयानंद चौधरी, सुनीता क्षीरसागर, सुवर्णा वेळापुरे, मोनिका चौधरी, तृप्ती बेडकुते, भाग्यश्री पिसे, संध्या शिंदे, योगिनी चवरे, प्रिया माहुले, रमेश नामदे, निलेश धर्माधिकारी या शिक्षकांसह निलेश भुसारे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *