करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेच्या मुलांची शाळा नंबर १ च्या मुख्याध्यापिका सुनंदा माने जाधव यांना महिला दिनानिमित्त पुण्यातील शिक्षण संजीवनी मासिक परिवाराच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरव करण्यात आला आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिक्षण संजीवनी परिवाराच्या वतीने शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येतो. यावर्षी करमाळ्यातील नगरपालिका शाळेच्या मुख्याध्यापिका माने जाधव यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदच्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा स्मिता कुळकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अकँडमीक कौन्सिल मेम्बर डॉ. राजश्री जायभाये, प्रा. मिता चौधरी, कल्पना गवरे व ज्येष्ठ साहित्यका चंद्रलेखा बेलसरे यांच्यासह शिक्षण संजीवनी परिवाराचे कार्यकारी संपादक डॉ. संजय जगताप व संपादक देविदास लिमजे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता काटम यांनी केले. डॉ. सतीश सातपुते, दत्तात्रय उभे, विद्याधर चव्हाण, महावीर जाधव, उज्वला जगताप, स्नेहा खडसे व देवयानी वैदनकर कार्यक्रमाचे समन्वयक होते.
