कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुरु : आमदार पाटील

करमाळा (सोलापूर) : कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुरू झाले असुन लाभक्षेत्रातील सर्व पाणीसाठ्यात पाणी देण्यात येणार असल्याची माहिती आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे. मुंबईत राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे. त्यात आमदार पाटील यांनी करमाळा मतदार संघातील विविध प्रश्नाबाबत आवाज उठवला असुन कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे त्यांनी केली होती.

आमदार पाटील म्हणाले, ‘मोरवड (ता. करमाळा) येथे पाणी दाखल झाले आहे. तालुक्यातील उत्तर भागातील पिकांना वेळीच पाणी मिळाले पाहिजे. यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटुन कुकडी आवर्तन सुरू करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार मागेच पाणी सोडण्यात आले व आजअखेर पाणी करमाळा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रात पोहचले आहे. योग्य ते पाणी नियोजन करुन उपलब्ध चाऱ्यांमधून पाणी देण्यात यावे,’ अशी सुचना अधिकाऱ्यांना त्यांनी दिली आहे. करमाळा तालुक्यातील लाभक्षेत्रात तब्बल नऊ दिवस पाणी राहणार आहे. कुकडीचे पाणी नियोजनबद्ध पद्धतीने दिले जाणार असुन शेतकऱ्यांनी सुद्धा सहकार्य करावे, असे आवाहन आमदार पाटील यांनी यावेळी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *