करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘करमाळा शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील ९० घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्यात यावी’, अशी मागणी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन देण्यात आले असून हे निवेदन नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे यांनी स्वीकारले. माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ, सामाजिक कार्यकर्ते फारूक जमादार, बापू शिरगिरे आदी यावेळी उपस्थित होते.
या निवेदनात कांबळे यांनी म्हटले आहे की, ‘करमाळा शहरात घरकुलाचे ९० लाभार्थी आहेत. त्यांना काम सुरु करण्यासाठी अडचणी येत आहेत. वाळूचे दर प्रचंड वाढले आहेत त्यामुळे काम कसे करायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. अशा स्थितीत सरकारने घरकुल लाभार्थींना मोफत ५ ब्रास वाळू देण्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे आता वाळू उपब्लध करून देण्यात यावी’, असे या निवेदनात म्हटले आहे.
