करमाळा (अशोक मुरूमकर) : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पोन्धवडी येथील शेतकऱ्यांना दिलेला शब्द बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी महिन्यातच पूर्ण केला आहे. तलावात पाणी यावे यासाठी प्रयत्न करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी गुळवे यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी तत्काळ चारी खोदून काम पूर्ण केले. आणि संबंधित तलावात पाणीही आले असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गुळवे यांच्या पत्नी वनिता गुळवे या कोर्टी गटातून विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.
करमाळा तालुक्यातील पोन्धवडी येथील तलावात कुकडीचे पाणी यावे अशी मागणी शेतकऱ्यांची होती. येथील काही शेतकऱ्यांनी लोकवर्गणी करून चारीचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र तरीही तलावात पाणी येण्याचा अडथळा दूर होत नव्हता. त्यामुळे गरजवंत शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उपाध्यक्ष गुळवे यांच्याकडे तलावात पाणी यावे यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी केली. त्यानंतर निवडणूक होताच गुळवे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार स्वखर्चाने चारीचे काम करून पाणी तलावात यावे यासाठी मदत केली.
सामाजिक कार्यकर्ते धंनजय कोडलिंगे म्हणाले, तलावात कुकडीचे पाणी यावे यासाठी आमचा प्रयत्न सुरु होता. त्यासाठीही चारीही होती. मात्र काही ठिकाणी अडचणी होत्या. आम्ही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणी करत काम पूर्ण करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र त्याला आणखी मदतीची आवश्यकता होती. त्यामुळे निवडणुकी दरम्यान गुळवे यांच्याशी आम्ही चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे निवडणूक होताच गुळवे यांनी काम सुरु केले आणि अडथळा दूर झाल्याने तलावात पाणीही दाखल झाले आहे. त्या पाण्यामुळे आम्हाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.’
‘आता तलावात पाणी आले आहे. मात्र चारीत आणखी काही ठिकाणी पाणी गळती मोठ्याप्रमाणात होत आहे. त्यामुळे पुरेसे पाणी मिळाले नाही. कुकडी पाटबंधारे विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गळती बंद होण्याच्या दृष्टीने काम पूर्ण करावे. त्यामुळे आणखी शेतकऱ्यांना मदत होणार आहे’, असेही कोडलिंगे यांनी सांगितले आहे. या कामासाठी चेअरमन हनुमंत कोडलिंगे, हनुमंत वाघ, सुदाम क्षीरसागर, रसूल सय्यद, मारुती कदम, महावीर अनारसे, बाळासाहेब गरदाडे, सलीम सय्यद, अप्पासाहेब जगदाळे, मछिंद्र क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले.
