करमाळा (सोलापूर) : आमदार नारायण पाटील यांच्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तन सलग तीन महिने सुरु राहिले. काही तांत्रिक अडथळे वगळले तर सलग हे आवर्तन सुरु असल्याने पूर्व भागासाठी शेतकऱ्यांना हे मोठे वरदान ठरले आहे. यामुळे या भागातील पाणी प्रश्न सुटला आहे.
दहिगाव उपसा सिंचन योजनेचे ४ जानेवारीला जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते आवर्तन सुरू करण्यात आले होते. या आवर्तनात नेरले, वरकुटे, घोटी, मलवडी चारी, केम चारी, निंभोरे, कोंढेज, लव्हे, सौंदे, वरकटणे, सरफडोह, शेलगाव (क), अर्जूननगर शिवार, फिसरे शिवारातील काही ओढे व बंधारे, गुरसळी, देवळाली, खडकेवाडी, कुंभेज, जेऊर, हजारवाडी, जेऊरवाडी आदी ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्यात आले.
जानेवारीत हे आवर्तन सुरू झाल्याने काही ठिकाणी पिकांच्या अडचणी असल्याने शेतकऱ्यांनी स्वतः हुन पाणी उपलब्ध असताना घेतले नाही. परंतु नंतर ऊसा सारखी पिके काढली गेल्यामुळे परत या भागात पाणी दिले गेले आहे. तर काही ठिकाणी बंदिस्त पाईपलाईन काम सुरु असल्याने पाणी देण्यात तांत्रिक कारणांमुळे अडचणी आल्या आहेत. अन्यथा बहुतांश ठिकाणी या तीन महिन्यांत पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच अजुनही मलवडी चारी, घोटी शिवारातील काही तलाव, शेलगाव परिसरातील काही बंधारे, पांडे ओढा, झरे व पोफळज तलाव आदी ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार पाटील यांच्याकडे आलेली असुन या ठिकाणी पाणी पोहोच करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी मेहनत घेत आहेत, असे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.
आवर्तन सुरू असल्याने उजनीतील शेवाळ मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक पंप, बंदिस्त पाईप व डिसी चेंबरमध्ये जमा होत आहे. कुंभेज येथील पंप हाऊस दोन समोरील पाणी साठवण भागात उजनीतील शेवाळ व प्लॅस्टिक जमा होऊन तांत्रिक खंड पडत आहे. यावर पाटबंधारे विभाग नियोजन करुन अडथळा दूर करत आहेत, असे सांगितले.
