करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी प्रशासक बाळासाहेब बेंद्रे यांनी पाच जणांना सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. त्यातील तिघांनी हे पद नाकारले असून दोघांनी मात्र सकारात्मकता दर्शवली असून आदिनाथ कारखान अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शक्यतेवढा प्रयत्न करू, असे स्पष्टपणे ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.
आदिनाथ कारखान्यावर प्रशासकीय सदस्य शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे व संजय गुटाळ यांच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार बेंद्रे यांनी हरिदास डांगे, डॉ. वसंतराव पुंडे, अच्युत पाटील, सुहास गलांडे व धुळाभाऊ कोकरे यांना सल्लागार म्हणून नियुक्त करत पत्र दिले होते. त्यानंतर ‘आदिनाथ अडचणीत असताना शेवटच्याक्षणी आम्हाला सल्लागार नेमले आहे. आदिनाथला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी निवडणूक घ्यावी व कारखाना बिनविरोध करावा,’ असे सांगत डांगे, डॉ. पुंडे व पाटील यांनी सल्लागार पद नाकारले होते. कोकरे यांनी यापूर्वीच पदाचा स्वीकार करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर गलांडे काय करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
गलांडे म्हणाले, ‘आदिनाथ हे शेतकऱ्यांचे मंदिर आहे. कारखाना अडचणीतून निघणे आवश्यक आहे. राजकारणाच्यापलीकडे याकडे पाहण्याची गरज आहे. कारखाना सुरु झाला मात्र यंत्रणा नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. अशापरस्थितीत त्याचे नुकसान कसे टाळता येईल यावर विचार होणे आवश्यक आहे. सल्लागार म्हणून आम्ही हवे तेव्हा मार्गदर्शन करू. गुटाळ यांच्याशी याबाबत चर्चाही झाली आहे,’ असेही त्यांनी सांगितले आहे.