करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पंचायत समितीत सध्या फोटोंवरून राजकारण सुरु झाले आहे. यामध्ये महापुरुषांच्या फोटोंचाही विसर सत्ताधाऱ्यांना पडला असल्याचा आरोप करत श्री छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सभापती व उपसभापती यांच्या कक्षात विरोधकांकडून करण्यात आले. या कक्षात राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री व पालकमंत्री यांचेही फोटो का नाहीत? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर जगताप समर्थकांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचाही येथे फोटो लावण्याची मागणी केली आहे.
करमाळा पंचायत समितीची निवडणूक झाल्यानंतर भाजप नेते दिग्विजय बागल यांनी सर्वात प्रथम स्व. दिगंबरराव बागल यांचा फोटो सभापती व उपसभापती यांच्या कक्षात लावला होता. त्यानंतर सभापती व उपसभापती निवड झाल्यानंतर या कक्षात स्व. अजित पावर व माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे फोटो शिंदे समर्थकांनी लावले. त्यानंतर बागल समर्थकांनी या कक्षात भाजप नेत्या जिल्हा परिषद सदस्या रश्मी बागल यांचाही फोटो लावला जाणार असल्याचे ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले होते. त्यानंतर काही दिवसातच रश्मी बागल यांचाही फोटो येथे लावण्यात आला. याचे वृत्त ‘काय सांगता’ने दिले होते.
तेव्हा जगताप समर्थकांनी माजी आमदार जगताप यांचा निवडणुकीत विजयी होण्याचा मोठा वाटा असल्याचे सांगत जगताप यांचाही फोटो असावा अशी इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान येथे महापुरुषांचे फोटो नसल्याचा प्रकार लक्षात येताच आमदार नारायण पाटील यांच्या समर्थक पंचायत समीतीच्या सदस्यांनी व समर्थक कार्यकर्त्यांनी महापुरुषांचे फोटो येथे लावत सत्ताधाऱ्यांना आठवण करून दिली. त्यानंतर येथे राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे फोटो का नाहीत? असा प्रश्न केला जाऊ लागला आहे.
महापुरुषांचा विसर का?
पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती यांच्या कक्षात श्री छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे फोटो का नाहीत? सत्ताधाऱ्यांना त्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे आमचे नेते आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज फोटो लावत प्रतिमा पूजन केले आहे, असे माजी सभापती अतुल पाटील यांनी सांगितले आहे.
माजी आमदार जगताप यांचाही फोटो आवश्यक
करमाळा पंचायत समितीच्या निवडणुकीत माजी आमदार जगताप यांनी भाजप आणि राष्ट्रवादीला पाठींबा दिला होता. त्यामुळे या कक्षात त्यांचाही फोटो आवश्यक आहे, अशी मागणी जगताप समर्थकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली होती. ‘काय सांगता’शी बोलताना काही कार्यकर्त्यांनी तशी इच्छाही व्यक्त केली होती.
पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांचेही फोटो का नाहीत?
भाजप नेत्या बागल यांचा फोटो या कार्यालयात लागला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेही फोटो या कक्षात नाहीत. त्यामुळे अनेक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
