करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत निंभोरे येथे बँक ऑफ इंडियाच्या वतीने (साडे शाखा) महिला स्वयंसहाय्यता समूहांना कर्ज वितरण मेळावा झाला. राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रवींद्र वळेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक जाधव, तालुका अभियान व्यवस्थापक योगेश जगताप उपस्थित होते. जगताप यांनी महिलांना बँक कर्ज परतफेड, व्याज अनुदान योजना, विमा योजना, व्यवसाय निर्मिती, विविध प्रकारचे निधी, PMFME योजनाबाबत मार्गदर्शन केले.
शाखा व्यवस्थापक जाधव यांनी महिलांना व्यवस्थित कर्ज परतफेड करावी व कर्जाचा वापर योग्य कारणासाठी करावा याबाबत मार्गदर्शन केले. शाखे मार्फत चार समूहांना 32.56 लाखचे वाटप करण्यात आले. एप्रिल 2023 पासून निंभोरे गावात 92 लाख कर्ज वाटप करण्यात आले आहे. कौशल्य समन्वयक प्रशांत मस्तुद यांनी DDUGKY मार्फत दिले जाणारे विविध प्रकारचे प्रशिक्षणबाबत माहिती दिली. उपसरपंच अनिता पाटील, प्रभाग समन्वयक आकाश पवार, दिलीप मूळे, राणी लक्ष्मी व जिजाऊ महिला ग्राम संघाचे पदाधिकारी, लिपिका CRP मंजुश्री मूळे, सुषमा वाघमारे, बँक सखी अनिता चव्हाण, FLCRP योगिता जानभरे व व्यवस्थापक पवार यांनी सहकार्य केले.