करमाळा (सोलापूर) : केंद्र व राज्य सरकारकडून सुरु असलेल्या रोजगार हमीच्या कामात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांचे मानधन थकल्याने संताप व्यक्त केला जात असून त्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. केंद्र सरकारने या योजनेचे नाव बदलून ‘व्हीजीरामजी’ अर्थात विकसित भारत जी राम जी केले. मात्र तरीही ग्रामरोजगार सहाय्यक मात्र उपाशीच असल्याचे करमाळा तालुका अध्यक्ष दत्ता हिरडे यांनी सांगितले.
सरकार या योजनेसाठी ग्रामविकास आणि शेतकरी विकासासाठी 60 व 40 टक्के निधी देणार आहे. परंतु राज्य सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी ग्रामरोजगार सहायकांना आठ हजार रुपये मानधन व दोन हजार रुपये प्रवास भत्ता देण्याचा निर्णय पारित केलेला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. ग्राम रोजगार सहायकांना मानधन मिळालेले नाही. या मानधनापासून ते वंचित आहेत. ग्रामरोजगार सहायकांना तर उपासमारीची वेळ आली आहे.
ग्रामरोजगार सहायकांना दरमहा आठ हजार ते दहा हजार मानधन देऊन सरकारने त्यांच्या मागण्या समजून घ्याव्यात, व्यथा समजून घ्याव्यात शिवाय 20 मार्च 2026 रोजी केंद्र सरकारच्या परिपत्रकानुसार आयुक्त नागपूर यांनी दोन वेळा मजुरांची ऑनलाईन हजेरी घेण्याचे परिपत्रक जाहीर केलेले आहे हे परिपत्रक ही नेटवर्क नसल्यामुळे रद्द करण्यात यावे व ग्रामरोजगार सहायकांना विमा कवच देण्यात यावे, अशा मागण्यांसाठी राज्यभर सुरू असलेल्या ग्रामरोजगार सहायकांच्या आंदोलनात करमाळा तालुका ही काम बंद आंदोलनाच्या सहभागी होत असल्याचे हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी दत्ता हिरडे, अनिल काळे, सचिन बोराडे, किरण मोरे, मारूती घोगरे, अॅड. हेमंत जाधव, अनिल तेली, अरूण गोळे, कांतीलाल भोसले, अंगद लांडगे उपस्थित होते.
