करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील तरटगावचे माजी सरपंच डॉ. अमोल घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला. मंगळवारी (ता. १८) तरटगाव येथे हा सत्कार झाला. यावेळी भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार नारायण पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविताराजे राजेभोसले, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, माजी सभापती अतुल पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख देवानंद बागल, प्राचार्य जयप्रकाश बिले, तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, केमचे अजित तळेकर आदी उपस्थित होते.
तरटगाव येथे झालेल्या या कार्यक्रमाला आळजापूर, बिटरगाव श्री, घारगाव, पाडळी, बोरगाव, पोटेगाव, बाळेवाडी येथील पाटील गटाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. घाडगे यांचा वाढदिवस झाल्यानंतर दोन दिवसांनी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला डॉ. घाडगे यांचा मित्र परिवारही उपस्थित होता. येथे झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. शशिकांत नरुटे यांनी केले. या सूत्रसंचालनात ऍड. नरुटे यांनी डॉ. घाडगे यांनी केलेल्या कामाची माहिती सांगितली.
कुकडी सीना संघर्ष समितीच्या माध्यमातून डॉ. घाडगे यांनी सीना नदीवरील बंधाऱ्यासाठी केलेले काम, सतत पाठपुरावा करून नागरिकांचे प्रश्न त्यांनी सोडवले असल्याचे ऍड. नरुटे यांनी सांगितले. प्रा. दुरगुडे यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार पाटील यांनी मोहिते पाटील, घाडगे कुटुंब व पाटील कुटुंबाचे कसे सबंध आहेत हे सांगत तालुक्यात केलेल्या विकास कामांची माहिती सांगितली.
मोहिते पाटील यांनी या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी सत्काराला उत्तर देताना ‘मला काहीच नको आहे फक्त माझ्या भागातील तरटगाव बंधाऱ्यात कुकडीचे पाणी द्या. मला वाढदिवसाचे हेच गिफ्ट हवं आहे,’ अशी डॉ. घाडगे यांनी मागणी केली आहे. हा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून सोडवण्याचा प्रयत्न करू, असं सांगितले आहे.