करमाळा (सोलापूर) : रिटेवाडी उपसासिंचन योजना करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. याशिवाय करमाळा तालुक्यातील प्रत्येक प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याचे आश्वासन देतानाच ‘करमाळा तालुक्यात आपले नेते आबाच (माजी आमदार नारायण पाटील) आहेत, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’, असे म्हणत भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सूचक विधान केले आहे. ‘गेल्यावेळी आबांना मी स्वतः ३६ गावांत लक्ष द्या, याबाबत हिंट दिली होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा परिणाम आता सोसावा लागत आहे’, असे ते म्हणाले आहेत.
करमाळा तालुक्यातील तरटगाव येथे माजी सरपंच डॉ. अमोल घाडगे यांच्या सत्कारावेळी मोहिते पाटील यांनी जोरदार भाषण केले. माजी आमदार नारायण पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सविताराजे राजेभोसले, प्राचार्य जयप्रकाश बिले, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, अमरजित साळुंखे आदी यावेळी उपस्थित होते. बागल गटाने गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटील यांच्याकडे वाढवलेली जवळीक आणि त्यातच धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलेले विधान महत्वाचे मानले जात आहे. त्यांनी करमाळा विधानसभा मतदार संघात असलेल्या माढ्यातील ३६ गावांवरून आमदार शिंदे यांचा नाव न घेता तेथे बोगस मतदान झाले असल्याचे म्हटले आहे.
‘गेल्यावेळी आबांना मी स्वतः ३६ गावांत लक्ष द्या, याबाबत हिंट दिली होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा परिणाम आता सोसावा लागत आहे’, असे मोहिते पाटील म्हणाले आहेत. करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसासिंचन योजना मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
डॉ. घाडगे यांनी सीना नदीतील तरटगाव बंधाऱ्यात दिघी येथून कुकडीचे पाणी सोडण्याची मागणी केली. यावरही त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन देत. त्यांनी राजकीय विधानेही केली आहेत.