करमाळा (अशोक मुरूमकर) : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहर हद्दीत नगर हायवेच्याजवळ ‘आयटीआय’समोर कुकडी कॅनलच्या बाजूला निर्जनस्थळी एका बेवारस कार दोन दिवसांपासून उभा होती. तिसऱ्यादिवशीही कार जागेवरून न हल्ल्याने तेथून येणाऱ्या जाणाऱ्याला संशय आला. काळी काच असलेल्या गाडीच्या जवळ जाऊन एकाने पाहिले तर त्यात अंगावर शहरे आणणार प्रकार दिसला. त्या कारमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह होता. करमाळा पोलिसांना ही खबर मिळाली आणि वेगाने सूत्र फिरवत चोवीस तासाच्या आत तपास लावून नाशिक जिल्ह्यातून दोन संशयित ताब्यात घेतले आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याचा कसून तपास सुरु असून याचे सर्व बाजू समोर येथील असा विश्वास आहे.
ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला तेथे माळरान आहे. त्या परिसरात एकही वस्ती नाही. अशा ठिकाणी एका कारमध्ये हा मृतदेह होता. त्याचा तपास करणे तसे अवघड होते. मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलिस निरिक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी तातडीने पोलिस पथकासह घटनास्थळी भेट दिली. आणि वेगाने तपास सुरु केला. संबंधित मृतदेह हा नाशिक जिल्ह्यातील अडसुरेगाव (ता. येवला) येथील असल्याचे समजले. श्रावण रघुनाथ चव्हाण (वय ३९) यांचा हा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रात्रीतच एक पथक तयार करून नाशिकला रवाना करण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर व पोलिस हवालदार अजित उबाळे यांचा या पथकात समावेश असल्याचे समजत आहे. त्यांनीही कसून चौकशी करत गुन्हा दाखल झालेल्या दोन संशयित आरोपीपर्यंत पोहचले. त्यांना घेऊन ते करमाळ्याकडे रवानाही झाले असल्याची माहिती आहे.
पथकाची तिकडे कारवाई सुरु असताना करमाळ्यातही अनेक घडामोडी घडत होत्या. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक मिटू जगदाळे व प्रवीण साने यांच्याकडूनही तपास सुरु होता. गुन्ह्याची उकल होण्यासाठी त्यांचा तपास सुरु होता. सोलापूर येथील ‘फोरेंन्सिक लॅब’चे एक पथक करमाळ्यात दाखल झाले. साधारण तीन तास तपास करून त्यांनी सर्व प्रकारचे नमुने तपासासाठी घेतले आहेत. यावर उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील व पोलिस निरीक्षक गुंजवटे हे लक्ष ठेऊन होते. यामध्ये इतर पोलिसही मदत करत होते.
अनैतिकसंबंधातून खून! नाशिक जिल्ह्यातील व्यक्तीचा करमाळ्यात कारमध्ये अढळला मृतदेह, एकजण ताब्यात
फिर्यादी खून झालेल्या श्रावणच्या भावाच्या म्हणण्यानुसार शनिवारी ३ तारखेला (वटपौर्णेमेदिवशी) गुन्हा दाखल झालेला मुख्य संशयित आरोपी श्रावणाचा मित्र सुनील घाडगे (रा. अंदरसूळ) याने फोन केल्यानंतर भाऊ श्रावण हा त्याच्या गावी गेला. त्यानंतर तो आलाच नाही. म्हणून त्याचा शोध घेत घाडगेच्या गावी म्हणजे अंदरसूळ येथे गेलो. तेव्हा माझे चुलत भाऊ बरोबर होते. तेथे गेलो तेव्हा घाडगेच्या घराला कुलूप होते. आजूबाजूस त्यांनी चौकशी केली तर त्यादिवशी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घाडगे, त्याची पत्नी व त्याचा भाऊ श्रावणला मारहाण करत होते, असे समजले. त्यानंतर त्यांनी अधिक माहिती घेतली तेव्हा घाडगेची आई व श्रावण यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे लोकांकडून समजले. त्यातून भांडणे झाली असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी श्रावणाचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. दरम्यान पोलिसात मिसिंग दाखल झाली होती. त्यानंतर करमाळा हद्दीत एका कारमध्ये त्याचा मृतदेह आढळला आहे. याचा पुढील तपास वेगाने सुरु असल्याचे दिसत आहे. तपासाबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून अजूनही यामध्ये अनेक माहिती समोर येणार असल्याचे समजत आहे. मात्र पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असून लवकरच सर्व उकल होईल, अशी शक्यता आहे.