करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील घारगाव येथील बेकायदा दारू व गुटखा विक्री यासह जुगार खेळणाऱ्यावर कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला आहे. सरपंच लक्ष्मी सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत ठराव करण्यात आला असून या ठरावाची प्रत पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांना दिले आहे.
येथील ग्रामपंचायत कार्यालय व शाळा परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. गावातील काहीजण मद्यप्राशन करून शाळा व ग्रामपंचायत कार्यालय परिसरात काचेच्या बाटल्या फोड आहेत. गुटखा व तंबाखू खाऊन परिसर अस्वच्छ करत आहेत. काचा फोडल्यामुळे लहान मुले व नागरिक जखमी होण्याची शक्यता आहे. याकडे गांभीर्याने पहाण्याची मागणी ग्रामस्थ रमेश होगले यांनी केली होती. त्यावर सभेत चर्चा करण्यात आली. त्यांनतर हा ठराव करण्यात आला आहे.
सरपंच सरवदे, उपसरपंच सतीश पवार व ग्रामपंचायत सदस्य यांनी ठराव मंजूर करून अशा व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली. गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. ती व्यसनापासून मुक्त व्हावी, अशी अपेक्षा सरपंच सरवदे यांनी व्यक्त केली आहे.