करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीच्या दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने अंतर्गत सहा महिने कालावधीच्या सीएनसी मशीन टेक्निशयनच्या कोर्ससाठी तालुक्यातील सहा तरुणांची निवड झाली आहे. या कोर्ससाठी संबंधित तरुण कोपरगाव येथील संजीवनी कॉलेज येथे गेले आहेत. करमाळा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी राजाराम भोंग, पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी. आर. सारंगकर, दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना तालुका कौशल्य समनव्यक प्रशांत मस्तूद, कक्ष अधिकारी अविनाश जरंडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरजू व बेरोजगार तरुणांना कौशल्याभिमुख रोजगार मिळवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार मोफत प्रशिक्षण देते. ब्युटी पार्लर, नर्सिंग बेसिक, फिनिशयर आणि पॅकर रेकॉर्ड किपर, फिटर मेकॅनिकल, अकाऊंट, हॉटेल मॅनेजमेंट, अकाऊंट एक्झिकेटिव्ह आदींचे प्रशिक्षण दिले जाते, असे मस्तूद यांनी सांगितले.