करमाळा (सोलापूर) : करमाळा पोलिस ठाणे परिसरात काल (मंगळवारी) दोघांमध्ये मारहाण झाली असल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी मध्यस्थी करून दोघांमधील ही मारहाण सोडवली होती. त्यानंतर याप्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये बीट हवालदार अझरुद्दीन महंमद युनूस शेख यांनी फिर्याद दिलीआहे . त्यावरून हा गुन्हा दाखल झाला असून यांचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एम. एन. जगदाळे यांच्याकडे आहे.
करमाळा पोलिस ठाणे परिसरात काल नागरिकांची कामांची लगबग सुरु होती. तेव्हा दोन पुरुष थेट पोलिस ठाण्यात आले. त्यानंतर बीट अंमलदार हॉलच्या समोर गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर थेट मारहाणीत झाले. हा प्रकार समजताच तेथील पोलिसांनी बाहेर येऊन त्यांचा वाद सोडवला. मात्र पोलिस ठाण्याच्या परिसरातच ही मारहाण झाली असल्याने त्यांना पोलिसांची भीती नाही का? असा प्रश्न निर्माण झाला असून या प्रकारात तत्काळ गुन्हा दाखल झाला आहे.
विजयकुमार उत्तम नागवडे (रा. रावगाव ) व मधुकर मच्छिन्द्र काशीद (रा. जामखेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिस ठाणेकडून त्यांना कामानिमीत्त कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. किंवा त्यांना कोणी बोलावलेले नव्हते. तरीदेखील पोलिस ठाणे परिसरात येऊन वाद केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक व्यहवारावरून त्यांच्यात हा वाद झाला आहे.