करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेटफळ येथे विनापरवाना बसवण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. २० वर्षांपासून असलेल्या या पुतळ्याला नियमित करण्यासाठी सरकारला गावकरी सर्वप्रकारचे सहकार्य करतील, मात्र पुतळा काढण्याचा प्रयत्न केला तर नागरिकांमध्ये उद्रेक होईल, अशी भावना गावकरी व्यक्त करत आहेत.
गावात जेऊरकडील बाजूने प्रवेश करण्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेजवळ साधारण २० वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी एकत्र येऊन एक छोटासा कट्टा तयार करून त्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा बसवला होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी शिवजयंती येथे साजरा होत. मात्र या पुतळ्याला अनेक दिवस झाल्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येऊन अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. आणि तो पुतळा बसवला देखील. मात्र याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानंतर येथे प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस यांनी भेट दिली. आणि हा पुतळा बेकायदा बसवला असल्याने काढून घेण्याची सूचना केली. मात्र याला गावकर्यांनी स्पष्टपणे नकार देत गावचा एकोपा ठिकवण्याच्या दृष्टीने हा पुतळा काढण्याचा प्रयत्न केल्यास उद्रेक होईल, अशी भावना व्यक्त केली. याबाबत कोठेही गावकरी कोणाचेही नाव न वापरता ही संपुर्ण गावाचा निर्णय असल्याचे सांगत आहेत. प्रशासनाने दिलेली नोटीस देखील कोणी स्वीकारली नाही. त्यानंतर ती नोटीस ग्रामपंचायत कार्यालय येथे लावण्यात आली आहे.
या प्रकरणात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी लक्ष घातले असून याची सर्व माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेलद्वारे दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून योग्य त्या सूचना प्रशासनाला येऊन सर्व शिवभक्तांच्या भावनेचा आदर करून प्रशासनाने पुतळाकाढण्याची भूमिका बदलावी, असे त्यांनी म्हटले आहे. शेटफळ येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा २० वर्षांपासून दिमाखात होता. मात्र काही कारणास्तव हा पुतळा गावकऱ्यांनी एकजुटीने एकत्रित येऊन सर्व समाजालाबरोबर घेऊन अश्वारूढ पुतळा उभा केला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात छत्रपतींचा पुतळा उभा करण्यास आडकाठी आणली जात असेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे, अशी भावना शिवभक्तातून उठत आहे
शेटफळ येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा वीस वर्षापासून असलेला पुतळा उघड्यावर असल्यामुळे या पुतळ्याला तडे गेले होते. त्यामुळे सर्व शिवभक्तांनी एकत्रित येऊन त्याच ठिकाणी पुन्हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसलेला आहे. आता प्रशासनाने या पुतळ्याची जबाबदारी घ्या, असे सांगत हा पुतळा काढून घ्या, अन्यथा कारवाई करू, असे पत्र सरपंच व ग्रामसेवकांना दिले आहे. दुसरीकडे गावकऱ्यांनी मात्र शांतता असताना सर्व समाज एकत्रित गुण्यागोविंदाने नांदत असताना प्रशासन हस्तक्षेप करून तणाव निर्माण करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
सरपंच विकास गुंड यांच्या म्हणण्यानुसार वीस वर्षांपासून येथे पुतळा होता. त्याच ठिकाणी युवकांनी पुतळा उभा केला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत गावातील कोणाचीही तक्रार नाही, असे असताना प्रशासन करत असलेली कारवाई गावकऱ्यांना मान्य नाही. भावनेचा विचार करून प्रशासनाने तोडगा काढावा.