करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा भाजपमध्ये सध्या बदलाचे संकेत आहेत. लवकरच नवीन तालुकाध्यक्ष येणार आहेत. त्यामुळे गणेश चिवटे यांच्या जागी आता कोण येणार अशी चर्चा सुरु झाली असून भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्या जागीही दुसरे अध्यक्ष येणार असून त्यांना कोणते पद मिळणार आणि नवीन तालुकाध्यक्ष कोण असतील यांची उत्सुकता लागलेली आहे.
करमाळा तालुक्यात गणेश चिवटे यांनी भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र पक्षाच्या नियमानुसार आता नवे अध्यक्ष येणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. चिवटे यांना जिल्हा नियोजन समिती मिळाली आणि त्यानंतर त्यांचे पक्षात प्रमोशनही झाले होते. सध्या भाजपचे ते करमाळा विधानसभा प्रमुख आहेत. करमाळ्यात भाजपचे तालुकाध्यक्ष पद मिळावे म्हणून पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ असून काहींनी वरिष्ठांकडे माहिती सादर केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार अमरजित साळुंखे, दीपक चव्हाण, शशिकांत पवार, सुहास घोलप, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार व काकासाहेब सरडे यांची तालुकाध्यक्षपदासाठी नावे चर्चेत आहेत. तर शहराध्यक्षपदासाठी चंद्रकांत राखुंडे व जगदीश अग्रवाल यांची नावे चर्चेत आहेत. मात्र यामध्ये कोणाला पद मिळू शकते हे पहावे लागणार आहे. लवकरच नावे जाहीर होतील, अशी चर्चा आहे. या निवडीत चिवटे यांच्या निकटवर्तीयांची वर्णी लागणार का हे पहावे लागणार आहे. बिटरगाव श्री येथील सरपंच डॉ. अभिजित मुरूमकर व खडकी येथील मोहन शिंदे यांचेही तालुकाध्यक्ष म्हणून नाव चर्चेत होते. मात्र सध्या ही नावे मागे पडली असल्याचे समजत आहे.
भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांचे काही दिवसांपासून करमाळा तालुक्यात दौरे वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही करमाळा दौरा केला होता. अशा स्थितीत नवे पदाधिकारी कोण असतील हे पहावे लागणार आहे.