करमाळा (सोलापूर) : महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात तालुक्यात 5 कोटीची कामे मंजूर झाली होती. यापैकी 95 लाख निधी मंजूर असलेली कामे ऑक्टोबर 2022 मध्ये रद्द झाली होती. मात्र सरकार निर्णयानुसार आता ही देखील कामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.
आमदार शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मंजूर असलेल्या कामांच्या निविदा निघालेल्या नव्हत्या, अशी 95 लाखाची कामे ऑक्टोबर 2022 मध्ये रद्द ठरविण्यात आली होती आता तो आदेश मागे घेतला असून सदर कामे 31 मार्च 2024 पर्यंत पूर्ण व्हावी, असा आदेश निघाला आहे. घरतवाडी, कुंभारगाव, सावडी, आळजापूर, लव्हे, वांगी नं.1, वांगी नं.2, वांगी नं. 3 ,वांगी नं.4, पांगरे, सांगवी नं.2, कोळगाव, घोटी, सालसे, आवाटी, देवीचा माळ, कोंढारचिंचोली, कंदर व सातोली या गावांमध्ये सामाजिक सभागृह ,गावांतर्गत व वाडीवस्तीवरील रस्ते मुरूमीकरण करणे ,गटर्स व इतर सोयी सुविधा पुरविणे आदी कामांसाठी प्रत्येकी 5 लक्ष याप्रमाणे निधी वितरित केला जाणार आहे. तरी संबंधित ग्रामपंचायतींनी ही कामे 31 मार्च 2024 पर्यंत पूर्ण करावीत असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे .
करमाळा मतदार संघाच्या भरीव विकासासाठी 2515 योजनेतून 50 कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषद विकासासाठी 10 कोटी व समाज कल्याण विभागाकडून 5 कोटी असे 65 कोटी निधी मंजुरीचे शासन अध्यादेश लवकरच निघतील, असेही त्यांनी सांगितले आहे.