करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील आळजापूर येथील स्मशानभूमीच्या जागेवर झालेले अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे, अन्यथा बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत तहसीलदारांना आज (शुक्रवारी) निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर आळजापूर येथील नागरिकांच्या सह्या आहेत.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आळजापूर येथे सीना नदीच्याकडेला स्मशानभूमी आहे. याचा सातबारा देखील आहे. मात्र या जागेवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे येथे सर्व समाजाला अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. सध्या नदीमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत. ज्यांना शेती आहे ते शेतात अंत्यसंस्कार करत आहेत. स्मशानभूमी नसल्याने पावसाळ्यात अडचण येत आहे. नदीत पाणी असल्यास अंत्यसंस्कार कोठे करायचे हा प्रश्न सतावत आहे. याकडे गांभीर्याने पाहून प्रशासनाने तत्काळ मार्ग काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर बाळू गायकवाड, मच्छिन्द्र गायकवाड, विष्णू आखाडे, अवधूत भालेराव, सिद्धार्थ घोडके, सुरेश पवार, अमोल घोडके, प्रकाश भालेराव, प्रकाश पवार, हलिंदर गायकवाड, रविकांत घोडके, बुद्धिसागर गायकवाड आदींच्या सह्या आहेत. निवेदन देतेवेळी ग्रामपंचायत सदस्य कैलास रोडे नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड यांनी हे निवेदन स्वीकारले.