करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्याची ऊस बिले न दिल्याने या कारखान्याविरुद्ध पुण्यात साखर आयुक्त कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दिली आहे. याबाबतचे पत्र ई- मेलद्वारे पाठवण्यात आले आहे.
प्रा. झोळ यांनी म्हटले आहे की, मकाई साखर कारखान्याने शेतकऱ्याचे ऊस बिल अद्यापपर्यंत दिले नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस नसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बिल मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बिलासाठी ६ सप्टेंबरला हलगीनाद करून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या पत्रावर प्रा. झोळ, कामगार नेते दशरथ कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष रवींद्र गोडगे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अंगद देवकते यांच्या सह्या आहेत.