करमाळा (सोलापूर) : करमाळा- आवाटी रस्त्यावर सालसेजवळ एक स्विफ्ट आणि टेंम्पो यांची समोरासमोर धडक झाली आहे. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही मात्र स्विफ्टचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणात टेंम्पो चालकाविरुद्ध भरधाव वेगात निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. विठ्ठल बाळासाहेब शिंदे (वय २३, रा. तेलंगवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यामध्ये रवींद्र तुकाराम हजारे (व्यवसाय शिक्षक, रा. जवळा, ता. जामखेड, जि. नगर, सध्या रा. शाहूनगर, करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे.
शिक्षक हजारे हे मोहोळ तालुक्यात नवोदय विद्यालयात शिक्षणासाठी असलेल्या मुलाला भेटण्यासाठी गेले होते. तेथून परतताना सालसेजवळ आले तेव्हा समोरून आलेल्या टेम्पोने त्यांच्या गाडीला धडक दिली आहे. हजारे यांच्या गाडीत त्यांची पत्नी, मित्र व त्यांची पत्नी आणि त्यांची आठ वर्षाची मुलगी होती. या अपघातामध्ये कारचे उजव्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. ३० तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता हा अपघात झाला आहे. याचा तपास प्रदीप चौधरी यांच्याकडे आहे.