करमाळा (सोलापूर) : सिंहासनावर आरूढ, बालगणेश, बैलगाडीत असलेले श्रीगणेश, शंकर पार्वती यांच्याबरोबर असलेले गणराय अशा विविध रूपांनी गणरायांचा अवघा रंग एकच झाल्याची अनुभूती बाजारपेठेत येत आहे. आज (मंगळवारी) घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठपणा करण्यासाठी बाजारपेठेत सजावटीचे साहित्य, पूजा साहित्य व गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली आहे.
करमाळा शहरातील सुभाष चौक येथे गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली आहे. मोठ्या आनंदोत्सवात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी करमाळकरांची तयारी पूर्ण झाली आहे. ढोल- ताशेच्या गजरात गणरायांना नेहले जात आहे. दत्त पेठ, राशीन पेठ व मेन रोड येथे गणेशभक्तांची गर्दी असून खरेदीसाठी लगबग सुरु आहे.